Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Wednesday, August 13, 2008

रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास



रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रिय मिडीया म्हणजे सीएनएन्,बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजुने बातम्या देत होता व रशियन मिडीया त्याच्या बरोबर विरुध्द बातम्या देत होता.

एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतराष्ट्रिय मिडियाचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करुन घेतला.मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मिडीयाच्या बरोबर राहुन आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुध्द रशियन मिडीया जॉर्जियाची कशी चुक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते.एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालुन आलेले सीएनएन,बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मिडीयानी चांगलाच समाचार घेतला.बातमीच्या आधीच्या फुटेजमधे साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मिडीया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत्'.मग थोड्या वेळानी साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे ,त्यानंतर मग आकाशातुन कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करु लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरुन व इतर सर्व बाजुंनी अंगरक्षकांनी गराडा घातला.यावेळी आंतरराष्ट्रिय मिडीयानी सांगितले की आकाशातुन जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे.याचा समाचार घेताना रशियन मिडीयानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतक लगेच घाबरुन जाण्यासारख काहीच झाल नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरु नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.

एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मिडीया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड्'चा इतिहास देत होता.जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरीष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे.जॉर्जियाने विविध देशांकडुन खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मिडीया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डीफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे,इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतक डिफेन्स बजेट कशाला लागत्,तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युध्दसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.

यामध्ये अमेरिकेच्या भुमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भुमिका घेत होते.त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढ म्हणनच बाकी ठेवल होत.रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरीकन डिप्लोमॅट्स व 'एक माणुस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडिल 'पार्टनर्स' आम्हाला समजुन घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारस लक्ष देउ नये.रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली.अमेरिकेचे १२३ वरीष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत्,अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधुन स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतुन जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता.त्याचबरोबर रशियन मिडीया अशीही बातमी देत होते की अमेरीकेनी जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे.तो अमेरीकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणने होते.

हा मुळ वाद तसा जुनाच आहे.पंधरा वर्षांपुर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता.रशियाचे म्हणने आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले.त्यानंतर रशियन शांतीदुत दक्षिण आसेतियात गेले.त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे.त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले.म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरीक झाले.आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे.मग जॉर्जियाने त्श्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतीदुत व रशियाचे नागरीक्(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला.जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करुन सत्ता उलथवण्याचा आहे.साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरुन व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणुन हिणवले होते.पुतीन असेही म्हणुन गेले की साकश्विली बरोबर बोलणी होउ शकत नाहीत्.

आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली.पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मधे गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युध्दाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते.मात्र रशियात रहाणार्‍या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रिय मिडीया व रशियन मिडीया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.
शनिवार १६ ऑगस्ट २००८
बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्‍या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा अमेरीकेला पाठींबा आहे वगैरे.

Wednesday, August 6, 2008

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार



शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.

Thevenot म्हणतो-शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत.

Cosmo Da Guarda म्हणतो-शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.

Orme म्हणतो-शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.

General Sullivan म्हणतो-ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते

J. Scott म्हणतो-शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.

Douglas म्हणतो-कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.

Abbe Carre म्हणतो-शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.

Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. ) म्हणतात-हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत.

Daughlas म्हणतो-शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात.

Da Guarda म्हणतो-शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता.

Sir E. Sullivan म्हणतात-शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.

Kincaid म्हणतो-शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात.

Elphinstone म्हणतो-शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.

Owen म्हणतो-वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला.

टिप्-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो.

कविराज भूषण म्हणतो-जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात