नेताजी सुभाषचंद्र बोस
काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती . नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की 'भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले?' या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच अशी त्यांच्याबद्दलची माहीती मिळवल्यावर माझी खात्री झालेली आहे.पण या इतक्या महान देशभक्ताला आमच्या देशाने कृतघ्नपणे अशी वागणुक दिली की त्याला आपल्या आयुष्यातली शेवटची दशके स्वतःची ओळख लपवत काढावी लागली.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!'पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली.गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला.काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही.गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला.त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात्.आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले की "मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल.मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही.मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत. "
नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती.त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता.
.
सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही येथे उल्लेख करावासा वाटतो.सध्या नेताजीम्चे अनेक समर्थक डावे असल्याने ते याच्याकडे दुर्लक्ष करतात.पण हा मुद्दा इतिहासाच्या पानांत महत्वाचा आहे.बोस्-सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्यांचे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात.त्यापेक्षा दुसर्या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले.यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या.
नेताजी सुटुन काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना 'Free India Radio' आणि 'Free India Cente'' सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने 'जय हिंद' हा नारा दिला तसेच 'जन गण मन' हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी' किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की "तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल". जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३फेब्र.१९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.
जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते.नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली.जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.नेताजी म्हणाले की ''आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-'चलो दिल्ली ,चलो दिल्ली'.मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्."नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की "तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?".त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते.आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत 'माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.'
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तथाकथित अपघाती मृत्युचे गुढ भारतात अनेक वर्ष होते.पण मुखर्जी कमिशनने दिलेल्या रीपोर्टनंतर हे स्पष्ट झाले आहे की त्यावेळी सुभाषबाबुंचा मृत्यु झाला नव्हता.तैवानने अशा प्रकारचा विमान अपघात झालाच नाही हे स्पष्ट केलेय्.असे म्हटले जाते की नेताजी त्यानंतर रशियात गेले होते.तेथे सायबेरीयात त्यांना ठेवले गेले होते.स्टॅलिनच्या मुलीने दिल्लीत पत्रकारांना हे स्पष्ट केले होते.सर्वपल्ली राधाकृष्णनही नेताजींना तेथे भेटले होते असे म्हणतात.त्यानंतर नेताजी चिनमधे गेले होते.त्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी संन्यास घेतला.१९५६ मध्ये भारत सरकारने हे मान्य केले की जर नेताजी भारतात आले तर त्यांना 'वॉर क्रिमिनल' म्हणुन ब्रिटनला सोपवले जाईल्.त्यानंतर १० वर्षांनी इंदिरा गांधींनीही तेच सांगितले.या सर्व काळामध्ये अनेक नेताजींच्या सहकार्यांनी त्यांना बघितले होते.काही जर्मन अधिकार्यांनीही त्यांना बघितले होते.त्यानंतर सुभाषबाबु भारतात आले आणि बरेच लोक असे म्हणतात की ते 'भगवानजी' अथवा 'परदा बाबा' या नावानी रहात असत.आनंदमयी मा,अतुल सेन,लीला रॉय,प्रतिभा मोहन रॉय वगैरेंना भगवानजी भेटले.यापैकी बरेच नेताजींना पुर्वीपासुन ओळखत होते.त्याचबरोबर इतरही अनेक नेताजींच्या साथीदारांनी भगवानजी हेच नेताजी आहेत असे सांगितले.पण नंतर भगवानजींनी अनेकांशी भेट नाकारली.नेहरुंच्या मृत्युच्या वेळीही भगवानजी त्यांना श्रध्दांजली वहायला गेले होते व काही वर्तमानपत्रात तसे फोटोही आले होते.गोळवलकर गुरुजींनीही त्यांच्याशी त्यानंतर पत्रव्यवहार केला होता.जनता पार्टीचे खासदार समर गुहा यांनी शपथेनी सांगितले की नेताजी जिवंत आहेत.आणि त्यांनी अनेकांना तसे फोटोही पाठवले.भगवानजी गुहांवर चिडले आणि परत कधीही त्यांना भेटले नाहीत्.मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला हे अमान्य केले.नंतर त्यांनीही 'नेताजी जिवंत आहेत व त्यांनी संन्यास घेतला आहे' असे सांगितले.भगवानजींनी ४ वेळा आपण नेताजी आहोत हे मान्य केले होते.भगवानजींच्या सामानामध्ये नेताजींची जर्मन दुर्बिण व खोसला कमिशनचे सुरेश बोस यांना दिलेले ओरीजिनल समन्सही सापडले.भगवानजी आणि नेताजी दिसायला सारखेच होते असे अनेकांचे मत होते.हस्ताक्षरतज्ञ बी.लाल कपुर यांनी नेताजींचे आणि भगवानजींचे हस्ताक्षर सारखेच आहे असे सांगितले होते त्याचबरोबर नेताजींची पुतणी ललिता बोस यांनीही भगवानजींचे हस्ताक्षर हेच नेताजींचे हस्ताक्षर आहे असे सांगितले.मुखर्जी कमिशन जरी नेताजी विमान अपघातात मारले गेले नाहीत व रेणकोजी मंदिरातील अस्थि त्यांच्या नाहीत असे सांगते तरी पुराव्यांअभावी 'भगवानजी हेच नेताजी आहेत' हे मान्य करत नाही.पण 'हिंदुस्तान टाईम्स्'ने घेतलेल्या शोधानंतर व अनेक नेताजींच्या सहकार्यांच्या म्हणन्याप्रमाणे नेताजी हेच भगवानजी होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे असे मी वर म्हटलेय त्याचे स्पष्टीकरण देतो. नेताजींची इंफाळ मोहिम फसली पण तरीही आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जेंव्हा भारतात वॉर क्रिमिनल्स म्हणुन आणले गेले तेंव्हा त्यांना जनतेनी प्रचंड पाठींबा दिला.आझाद हिंद सेनेच्या फौजांच्या कर्तुत्वाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली.Commander-in-Chief असलेल्या Claude Auchinleck ने म्हटले की 'भारतीय सैनिकांमध्ये आझाद हिंद सेनेबद्दल आदराची भावना आहे.'त्यानंतर रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या ५२०० सैनिकांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना होणार्या शिक्षांच्या निषेधार्थ बंद पुकारला.आणि त्यानंतर हीच बंदाची भुमिका भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये पसरली.त्याचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुर्ण भारतीय नेव्हीने उठाव केला व युनियन जॅक बर्याच जहाजांवरुन उतरवला.त्याचबरोबर मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला.या व इतर सर्व घटनांकडे ब्रिटीशांचे लक्ष होते. नवनिर्वाचित ब्रिटीश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी ब्रिटनच्या संसदेत हे स्पष्ट केले की 'ब्रिटीश भारतीय सैन्य आता काही ब्रिटीश सत्तेच्या ऐकण्यात राहीलेले नाही.त्यामुळे कधीही हे संपुर्ण सैन्य ब्रिटीशांच्या विरुध्द जाउ शकते.व दुसरीकडुन भारतात सैन्य पाठवणे शक्य नाही.त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग आहे.'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांच्या 'हिस्टरी ऑफ बेंगाल' पुस्तकाला कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधिशांनी एक पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी सांगितले की जेंव्हा ते राज्यपाल होते तेंव्हा पंतप्रधान ऍटलींशी त्यांची कलकत्त्यात भेट झाली.त्यावेळी चक्रवर्तींनी 'गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताच्या स्वातंत्र्य देण्यात किती वाटा आहे' असे ऍटलींना विचारल्यावर ऍटलींनी उत्तर दिले 'मि-नि-म-ल'.यावरुन हे स्पष्ट होते की आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच लागेल व त्यांना अशा प्रकारचे सैन्य उभे करणास प्रोत्साहित करणार्या स्वा.सावरकरांचे अप्रत्यक्ष योगदान देण्याचे श्रेयही द्यावेच लागेल. कुशल वक्तृत्व्,त्यातुन सैन्याला आपले सर्वस्व देउन धाडस करण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्य नेताजींमध्ये होते.लेखाचा शेवट नेताजींच्या सिंगापुरमधील एका भाषणाच्या ओळींनी करतो.त्यांचा धिरगंभीर आवाज्,त्यातील हृदयाला भिडणारी भाषा यामुळे आजची परीस्थिती पुर्णपणे वेगळी असुनही अंगावर काटा उभा रहातो. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना हैहमै कुर्बानी खाना है सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकरकोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!!
चिन्मय कुलकर्णी