Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, May 26, 2009

आमची पिटर्सबर्गची यात्रा

मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबरचे युध्द जिंकले आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे शहर वसवले गेले.पिटरला यात खुप अडचणी आल्या आणि त्याला अनेकांनी विरोधही केला.पण तरीही पिटरने हे शहर वसवले. पिटर स्वतः अतिशय हौशी होता.त्याला स्थापत्यशास्त्र व नौका बनवण्यातही रस होता.पिटरची दुसरी बायको कॅथेरीन पण अतिशय हौशी होती.तिने अनेक कलावंत,शिल्पकार्,स्थापथ्यकार यांच्याद्वारे शहर सजवले.पिटर्सबर्ग हे शहर नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरल्याने या शहरातील लोकांचा पर्यटकांकडे पहाण्याचा दृष्टीकोण अतिशय सकारात्मक आहे.कुठल्याही व्यक्तीला काहीही विचारल्यास तो नक्की त्याचे उत्तर देतो.आम्हाला तर अनेकदा अनेक लोकांनी स्वतःहुन विचारपुस करुन मदत केली.अनेक वृध्द स्त्रीया आम्ही रस्त्यात वाट पहात असताना स्वतःहुन सांगुन जात कुठे जायचे वगैरे.येथील लोकांवर तसे संस्कारच आहेत म्हटल्यास हरकत नाही.पिटर्सबर्ग हे शहर त्या मानानी बर्‍यापैकी शांत,cool आहे.मॉस्कोसारखी गर्दी,धावपळ पिटर्सबर्गमधे नाही.पिटर्सबर्गची मेट्रो जगातली सर्वात खोल मेट्रो आहे.सर्वात खोल स्टेशन १०५ मिटर्स जमिनीच्या खाली आहे. आम्ही ५ तारखेला रेल्वेने पिटर्सबर्गकडे निघालो.२५ तासांच्या सफरीनंतर ६ तारखेला दुपारी तेथे पोहोचलो.आम्ही बुकिंग केलेल्या होस्टेलला शोधण्यात थोडा वेळ गेला.पण १-२ जणांनी स्वतःहुन नकाशा पाहुन आम्हाला मदत केली.लगेच तयार होउन आम्ही फिरायला निघालो.


फोटो येथे बघु शकता-
http://picasaweb.google.ru/chinya1985/StPeterburgPhotos#


नेव्हस्कीय प्रॉस्पेक्ट
पहील्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेव्हस्कीय प्रॉस्पेक्टवर फिरलो.येथील जवळपास सर्व इमारती सुंदर व काहीतरी इतिहास असलेल्या आहेत्.त्यात कॅथेरीनची बाग,अलेक्सांदरचे थिएटर्,कॅथरीनचा पुतळा,मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय,चॉकलेट संग्रहालय,गोस्तीय द्वोर,समर गार्डन्स्,समर पॅलेस या गोष्टी बघण्यासारख्या आहेत्.उलित्सा रोसी म्हणजेच रशियाचा रस्ता अतिशय सुंदर आहे.या रस्त्याच्या दोन बाजुंना दोन इमारती आहेत ज्या सारख्या आहेत्.दोन्हीही इमारतींची उंची आणि रुंदी ६६फुट आहे तर त्यांची लांबी ६६० फुट आहे.या इमारतींमधे राणीची नृत्यशाळा होती.लोमोनोसोव्ह चौकापासुन (स्क्वेअर) अलेक्शांडरच्या थिएटरकडे बघतानाचे दृश्य अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी अनेक सुंदर छोटेमोठे पुल आहेत्.त्याच्यातली विविधता पण खुप सुंदर आहे.एका पुलावर चार बाजुंना चार पुतळे आहेत्.त्यात एक घोडेस्वार प्रथम खाली पडतो आहे आणि नंतर तो उठुन त्या घोड्याला आटोक्यात आणतो हे अतिशय सुंदर दाखवले आहे.

उलित्सा रोसी

आर्ट स्क्वेअर-मिहायलोव्स्की पॅलेसच्या समोर हा चौक आहे.येथे रशियातील सर्वात लोकप्रीय कवी पुश्कीनचा पुतळा आहे.मिहाइलचा महल १८२५ साली बांधण्यात आला होता.तेथे आता रशियन वस्तुंचे संग्रहालय आहे.जवळपास ३,८०,००० चित्र व वस्तु तेथे आहेत.
स्पास ना क्रोवी किंवा सेव्हियर ऑन स्पिलड ब्लड-मार्च १८८१ साली अलेक्सांडर दुसरा याची बाँबने हत्या करण्यात आली.ज्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला त्या ठिकाणी त्याचा मुलगा अलेक्सांडर तिसरा याने एक चर्च उभे केले.म्हणुन त्याला वरील नाव पडले.मॉस्कोतल्या रेड स्व्वेअर वरील बॅसीलच्या कॅथेड्रलची हुबेहुब प्रतीकृती म्हणुन हे चर्च प्रसिध्द आहे.येथे पिटर आणि कॅथरीनच्या डुप्लिकेट्सबरोबर आम्ही फोटो काढले.

स्पास ना क्रोवी

इंजीनिअर्स्कीय झामोक म्हणजेच इंजिनिअर्स किंवा मिहाइलचे कॅसल-१८व्या शतकाच्या मध्यावर पिटरची मुलगी एलिझाबेथचा महाल बांधण्यात आला. नंतर त्याचे मिहाईलच्या किल्ल्यात रुपांतर झाले.याच्या सर्व बाजुंनी आधी पाणी होते.उचलले जाणार्‍या पुलावरुन येथे ये-जा होत असे.'पॉल पहील्या'ने सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली होती.पण 'अलेक्सांडर पहील्या'च्या मारेकर्‍यांनी पॉलची येथे हत्या केली .पॉल त्या किल्ल्यात रहायला येउन तेंव्हा जेमतेम ४० दिवस झाले होते.गुप्त खोल्यांमुळे मारेकर्‍यांना पॉलला शोधुन काढणे खुप अवघड गेले.१८३८ साली येथे मिलिटरी इंजीनीअरींग स्कुल सुरु झाले.पहील्या पॉलने १८०० साली किल्ल्याच्या समोर पिटरचा पुतळा उभारला.येथुन जवळच मार्बल पॅलेस्,पावलोव्स्किय बॅरॅक्स आहेत.
कझानस्कीय सबोर म्हणजे कॅथेड्रल ऑफ लेडी ऑफ कझान-ही अतिशय भव्य इमारत आहे. ही १८११ साली बांधण्यात आली.कॅथेड्रलच्या आतमध्ये कझानच्या राणीचा पुतळा आहे.तर कॅथेड्रलच्या बाहेर कुतुझोव आणि बार्कले यांचे पुतळे आहेत. नेपोलियनचा पराभव करणार्‍या सैन्याचे हे दोघे सेनापती होते.त्यातील कुतुझोव्हचे थडगे कॅथेड्रलच्या आतमध्ये आहे

कझान कॅथेड्रल
या आणि इतर अनेक इमारती बघुन रात्री ११ नंतर आम्ही होस्टेलला पोहोचलो.सेंट पिटर्सबर्गमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपुर चालण्याची तयारी ठेवावी.पाय दुखत आहेत म्हणुन इथे चालत नाही.बस,टॅक्सी,कार यातुन फिरण्यात मजा नाही कारण नेव्हस्कीय प्रॉस्पेक्टवरील जवळपास सर्वच इमारती बघण्यासारख्या आहेत्.मुलींनी हाय हील्स घालु नयेत.

द्वोर्स्काया प्लोशाद किंवा पॅलेस स्क्वेअर -दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही पॅलेस स्क्वेअरला गेलो.हा चौक फार सुंदर आहे.या चौकाच्या मध्दभागी अलेक्सांदरचा स्तंभ आहे.पहिला अलेक्सांदरने नेपोलियनचा पाडाव केल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ १८३४साली बांधण्यात आला.ग्रॅनाईटने बनवलेला हा स्तंभ अशा प्रकारचा जगातला सर्वात उंच स्तंभ आहे.त्याची उंची ४७.५मिटर आणि वजन जवळपास ५००टन आहे.स्तंभावर एका परी बनवली आहे तीचा चेहरा अलेक्सांदरशी जुळणारा आहे असे म्हणतात.मागच्या शतकात हा स्तंभ पडेल का अशी भिती निर्माण झाली होती.दुसर्‍या महायुध्दात या परीसरात बराच बाँबवर्षाव झाला होता पण आश्चर्यकारक रीत्या या स्तंभाला काही झाले नाही.या स्तंभाच्या एका बाजुला 'जनरल स्टाफ बिल्डींग' आहे. ही इमारतही अतिशय सुंदर आहे.त्याच्या मध्यभागी एक ब्राँझचा रथ आहे.स्तंभाच्या दुसर्‍या बाजुला विंटर पॅलेस आहे.

द्वोर्स्काया प्लोशाद

झिम्नीय द्वारेत्स किंवा विंटर पॅलेस्.किंवा एर्मिताझ(hermitage)-ह्या इमारतीमध्ये १८३२ पासुन १९१७ पर्यंत रशियन त्सार रहात असत. ही अतिशय भव्य इमारत आहे व त्याच्या वरती अनेक शिल्पकाम केलेले आहे.येथे सध्या एर्मिताझ म्हणजे Hermitage हे जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय आहे.ज्यात तीस लाखाहुनही अधिक वस्तु(art works) आहेत.जर तुम्ही प्रत्येकाच्या समोर एक मिनिट जरी थांबलात तरीही संपुर्ण संग्रहालय बघायला तुम्हाला ४ वर्ष लागतील्.कॅथेरीन राणिने १७६४ साली स्वतःचा व्यक्तीगत संग्रह खुला केला होता.त्यानंतर यात भर पडत पडत गेली व आता हे प्रचंड संग्रहालय बनले आहे.येथे युरोपातील विविध देशांमधील चित्रे,शिल्प व इतर गोष्टी आहेत.लिओनार्डो दा विंची,मिचेल एंजेलो,पिकासो यांच्या चित्रांपुढे सर्वात जास्त गर्दी असते.दा विंचीची २ चित्रे आणि मिचेल एंजेलोची २ शिल्पे येथे बघायला मिळाली.त्याचबरोबर जगातल्या अनेक मोठ्या चित्रकारांची,शिल्पकारांची कारागीरी येथे आहे.इटॅलियन आणि फ्रेंच विभाग अवश्य पहावाच असा आहे. मला सेंट पिटर्सबर्गमधील सर्वात आवडलेले ठिकाण हेच आहे.येथे भारतासाठीही एक विभाग आहे.त्यात मुघलकालीन शस्त्रास्त्रे,टिपुचे आसन्,गौतम बुध्द्,राम्,महिषासुरमर्दिनी,जैन तिर्थंकारा,गणपती यांच्या मुर्त्या आहेत.नोव्हिय एर्मिताज किंवा न्यु हर्मिटेज हे १८४२ साली बनवण्यात आले.याच्या सुरुवातीलाच अ‍ॅटलांटसचे दहा भव्य पुतळे आहेत जे जणुकाही इमारतीला उचलुन धरत आहेत्.प्रत्येक पुतळा बनायला एक वर्षाचा कालावधी लागला होता.

एर्मिताझ मधील लिओनार्डो दा व्हिंचीचे 'मॅडोन्ना अँड द चाइल्ड'

इसाक्स्कीय साबोर किंवा सेंट आयसॅक्स कॅथेड्रल-ही इमारत अतिशय सुंदर आहे.त्याची उंची १०१ मिटर इतकी आहे.१७१० साली सर्वात पहील्यांदा येथे चर्च बनवण्यात आले.त्यानंतर हळुहळु ते वाढत वाढत जाउन सध्या अतिशय मोठे झाले आहे.सध्याची इमारत १८१८ साली बांधण्यास सुरुवात झाली व ४० वर्षानंतर ती इमारत पुर्ण बांधुन झाली.सध्या आतमध्ये संग्रहालय आहे.या इमारतीच्या मध्यभागी एक घुमट आणि बाजुला ४ घुमट आहेत्.इमारत बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने वापरण्यात आले आहे.चर्चच्या आतमध्येही सोने वापरले आहे व शिल्पकाम केले आहे.एकुण ५००किलो सोने या इमारतीत वापरण्यात आले आहे.आतील शिल्पकामही भव्य आणि सुंदर आहे.इमारतीच्या वरच्या भागापर्यंत पायर्‍यांनी चढत जाता येते व सर्व शहर येथुन सुंदर दिसते.ह्या इमारतीचे वजन ५५ मजली इमारतीइतके आहे.

आयसॅक कॅथेड्रल

ब्राँझ हॉर्समन अथवा म्योद्निय व्साद्विक-शहर ज्यानी वसवल त्या पिटर पहील्याचा हा पुतळा पिटर तिसर्‍याच्या बायकोने म्हणजे कॅथेरीनने वसवला.तीचे मुळ जर्मन होते. १२ वर्षांच्या कारगिरीनंतर हा पुतळा १७८२ साली पुर्ण झाला. हा पुतळा अतिशय प्रसिध्द आहे.यात पिटर घोड्यावर बसलेला आहे आणि त्याच्या घोड्याच्या मागच्या पायांजवळ एक मोठा साप आहे.पिटरच्या आधुनिकतेचा आणि सुधारांचा विरोध करणार्‍या लोकांना हा साप दर्शवतो.तरीही त्या सापाला पायदळी तुडवुन पिटर त्याची वाटचाल पुढे करतोय असे यात दाखवले आहे.ग्रॅनाईटच्या एका मोठ्या खडकावर हा पुतळा उभारण्यात आला आहे.त्या खडकाला Thunder Stone म्हणतात.हा खडक पिटर्सबर्गपासुन ६किमी अंतरावर सापडला होता.तो तिथुन सध्याच्या ठिकाणि आणन्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला.काहींच्या मते १५००टन वजन असलेला हा खडक जगातील इतक्या अंतरावर एकसंध हलवण्यात आलेला सर्वात मोठा खडक आहे.रशियातल्या सर्वात प्रसिध्द कवी पुश्किनने १८३३ साली या पुतळ्याला बघुन 'ब्राँझ हॉर्समन' नावाची कविता लिहिली. ही कविता रशियनमधील सर्वात सुंदर कवितांपैकी एक आहे.या सुप्रसिध्द कवितेमुळे हा पुतळा या नावाने ओळखला जाउ लागला.या कवितेत राज्यकर्त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या गरजा यांच्यातली तफावत दाखवली आहे.जनतेसाठी पुरातुन वाचणे मुश्किल झाले आहे आणि राज्यकर्ते उत्तमोत्तम स्थापत्य बनवण्यात मग्न आहेत असे या कवितेचा नायक म्हणत असतो.

ब्राँझ हॉर्समन

नॉच्नोय पिटेर्बुर्ग अथवा रात्रीचे पिटर्सबर्ग-पिटर्सबर्गमधे एक खासीयत ही आहे की येथे नदीवर अनेक छोटेमोठे जवळपास ३४२ पुल आहेत्.या शहराला त्यामुळेही 'उत्तरेकडील व्हेनिस' म्हटले जाते.यातील ११ पुल रात्री १ ते सकाळी ४ पर्यंत उघडतात. हे दृश्य आम्हाला पहायचेच होते.त्यामुळे आम्ही रात्रीच्या पिटर्सबर्ग ची सैर करायचे ठरवले.त्यात रात्री दिसणारे पिटर्सबर्ग बसने दाखवण्यात आले व त्याचबरोबर रात्री १ ते २.३० पर्यंत एका नौकेतुन उघडणारे पुल दाखवण्यात आले. हा अनुभवही छान होता.कारण सर्व शहरातील इमारतींचे ,पुलांचे विविध प्रकारच्या प्रकाश व्यवस्थेचे अतिशय सुंदर दृश्य दिसुन येते.यात आम्ही वासीलेयस्कीय ओस्त्रोव्ह्,स्फिंक्स,१२ विद्यालये या नविन गोष्टी बघितल्या.त्याचबरोबर पिटरचे लाकडी घरही बघितले.जेंव्हा शहरात काहीही नव्हते,तेंव्हा हे पहीले घर बांधण्यात आले होते.आधी ते पिटरच्या उंचीपेक्षाही कमी होते,नंतर त्याची उंची वाढवण्यात आली.त्याचबरोबर १८१७ ची ऑक्टोबर क्रांतीच्या शेवटाची जेथुन सुरुवात झाली ती 'आव्रोरा किंवा Aurora' युध्दनौकाही बघितली.यातुन एक ब्लॅंक शॉट राजवाड्याच्या दिशेने करण्यात आला.जो क्रांतीकारकांना संकेत होता.मग कम्युनिस्ट क्रांतीकारकांनी विंटर पॅलेसमधे शिरुन राजघराण्यातील सर्वांचा खुन केला.त्याचबरोबर रात्री नौकेतुन आम्ही उघडणार्‍या पुलांचे विहंगम दृश्य पाहीले.या सैरेमधे आमची गाईड चांगलीच दैववादी निघाली.तिने शहरातील अनेक इच्छा पुर्ण करणारी स्थळे दाखवली.मी माझ्या पुढील महत्वाच्या परीक्षांची सोय लावायचा प्रयत्न केला.पिटर्सबर्गमधील एक अतिशय छोट्या पण छान असलेल्या पुलाबद्दलही लिहितो.ग्रीफॉन स्टॅत्यु असे त्याचे नाव आहे.यातील पक्ष्याचे पंख सोन्याने मुलामा दिलेले आहेत्.रात्रीतुन पॅलेस स्क्वेअर सर्वात सुंदर दिसते असे मला वाटते.पिटर्सबर्गला जाणार्‍या प्रत्येकाने ही सैर जरुर करावी असे माझे मत आहे.सकाळी ६ वाजता मेट्रो सुरु झाल्यावर आम्ही अतिशय थकलेल्या अवस्थेत होस्टेलमधे पोहोचलो.

उघडणारे पुल.

त्सार्स्कोए सीलो किंवा पुश्किन म्हणजेच राजांचे नगर-आद्ल्या रात्री पुर्ण जागल्याने दुसर्‍या दिवशी आम्ही अतिशय थकलेल्या अवस्थेत उशीरा बाहेर पडलो.त्या दिवशी त्सार्स्कोए सीलो अथवा पुश्किन बघायला जायचे होते.येथे ३ महाल आहेत्.पहीला कॅथेरीनचा महाल्,दुसरा आलेक्सांदरचा महाल आणि तिसरा पावेलचा महाल आहे.त्याचबरोबर महालाच्या बाहेर सुंदर बागा आहेत्.आम्ही उशीरा पोहोचल्याने आम्हाला कॅथेरीनचाच महाल पहाता आला.पण हा महाल अतिशय मोठा आणि सुंदर आहे.येथे एक अँबर रुम होती.अतिशय महाग अशा अँबरनी आणि सोन्यानी एक पुर्ण खोली सजवण्यात आली होती.त्याच्या सुंदरतेमुळे त्याला जगातले ८वे आश्चर्यही म्हटले जायचे.अतिशय महाग असे ६ टन अँबर यासाठी वापरण्यात आले होते.दुसर्‍या महायुध्दाच्या काळी नाझी सैन्याने या महालाचा ताबा घेतला होता. नाझींना तेथुन बाहेर हाकलल्यावर अँबर रुममधील अँबर गायब होते.आजपर्यंत हे कळले नाही की ते सर्व अँबर कुठे गेले.त्यानंतर परत ही अँबर रुम बनवण्यात आली आहे.त्याचे फोटो काढायला परवानगी नाही तरीही आम्ही गपचुप काही फोटो काढले.महालासमोरील बागही सुंदर आहे.त्यात अनेक पुतळे आहेत.त्यानंतर आम्ही काही काळ महालापुढील बागेत घालवुन परतलो.

कॅथेरीनचा महाल

पितेर्गोफ -नंतरच्या दिवशी दुपारी आम्ही पितेर्गॉफला गेलो. हे शहरापासुन एक तासाच्या अंतरावर आहे.बसने जाताना वाटेत राष्ट्रपतीचा महाल दिसतो.राष्ट्राध्यक्ष जेंव्हा पिटर्सबर्गला येतात तेंव्हा या महालात रहातात्.पितेर्गॉफचे वैशिष्ठ्य म्हणजे तेथे असलेले कारंजे आहेत्.अनेक छोटेमोठे कारंजे येथे आहेत्.त्याचबरोबर पिटरचा महालही आहे.फिनलंडच्या खाडीच्या काठावर हे वसलेले आहे.आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी तेथे दुसरे महायुध्द जिंकल्याबद्दलचा विजयदिवस साजरा केला जात होता.तेथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतिषबाजी झाली.येथील मुख्य कारंज्यांचे कॉम्प्लेक्स छान आहे.मध्यभागी सॅमसनने एका सिंहाचा जबडा उघडला आहे असा पुतळा आहे.सिंहाच्या जबड्यातुन एक मोठा कारंजा आहे.रशियाने स्वीडनवर मिळवलेल्या विजयाचे हे प्रतिक आहे.कारण सिंह हे स्वीडनचे कुल-चिन्ह (कोट ऑफ आर्म्स) आहे.मुळ सॅमसनचा पुतळा नाझी जर्मन फौजांनी लुटला होता.त्याचबरोबर याच्या आजुबाजुला अनेक पुतळे आणि कारंजे आहेत्.पिटेर्गॉफची खासीयत ही आहे की त्याच्यातील कारंज्यांना कुठेही पंप लावलेले नाहीत.नैसर्गिक झर्‍यांमधुन पाणी साठवले जाते आणि उंचीच्या फरकामुळे कारंजे बनवण्यात आले आहेत्.सॅमसनचा कारंजा ज्याचे पाणी २० मिटर उंच उडते तो ४ किलोमिटरच्या खास aqueduct ने बनवण्यात आला आहे.पितेर्गॉफमधील पिटरचा महाल व गुहांमधील कारंजेही अप्रतिम आहेत.या दिवशी परतताना आम्हाला पाउस लागला.गडबडीत आम्ही उलट्या दिशेने जाणार्‍या बसमधे चढलो आणि एका तासाऐवजी तीन तास प्रवास केला.मग 'तंदुर' नामक भारतीय रेस्टॉरंटमधे गेलो (कारण आमच्या शहरात भारतीय रेस्टॉरंट नाही).'तंदुर' रेस्टॉरंट हे आमच फसलेल प्रकरण होत. त्या संध्याकाळी आम्ही रहात असलेल्या हॉस्टेलमधे आम्हाला एक पुर्व जर्मनीत रहाणारा जर्मन मनुष्य भेटला.तो बिचारा एकदम भावुक झाला होता कारण त्या दिवशी जर्मनीविरुध्द जिंकलेल्या युध्दाचा उत्सव चालु होता्आ जर्मन असल्याने त्याला त्याच्या देशाला हरवल्याबद्दलचा आनंदही टोचत होता आणि कम्युनिस्टांनी त्यांच्यावर नंतर केलेल्या राज्याचेही दु:ख होते.

पितर्गॉफ

पित्रोपावेल्स्कीय क्रेपस्त किंवा पिटर अ‍ॅण्ड पॉल फोर्ट्रेस.-शेवटच्या दिवशी आम्ही पिटर आणि पॉलचा किल्ला बघायला गेलो.हा किल्ला हे पिटरने सेंट पिटर्सबर्गमधे बनवलेली पहीली इमारत होती.त्याची पायाभरणीही त्यानेच केली होती. हा किल्ला एका वेगळ्या बेटावर बांधण्यात आला आहे.त्या बेटाला जॉनच्या पुलाने जोडले जाते्आ पुल लाकडी आहे.१७०३ ते १७४० पर्यंत हा किल्ला बांधला जात होता.पिटरच्या भव्य दरवाज्यातुन किल्ल्याच्या आत जाता येते.या दरवाज्यावर पिटरच्या पराक्रमाच्या कथा कोरलेल्या आहेत.

पिटर आणि पॉलचा किल्ला

पिटरचा विवादास्पद पुतळा-इतर ठिकाणी जरी पिटरच्या पुतळ्यात त्याला एखाद्या हिरोसारखे बनवले असले तरीही तो दिसायला फारच जेमतेम होता असे ऐतिहासिक पुरावे सांगतात.तो खुपच उंच,लुकडा,इतर शरीराशी तुलना केल्यास फारच लहान डोके असलेला होता.त्याला बघुन शत्रुच नाही तर पिटर्सबर्गचे रहीवासीही घाबरुन जात.त्याचा असा एक पुतळा १९९१ साली बनवण्यात आला व तो येथे बघितला जाउ शकतो.

पिटरचा विवादास्पद पुतळा

पित्रोपावेल्स्कीय साबोर किंवा पिटर आणि पॉलचे कॅथेड्रल-किल्ल्याच्या आतमध्ये पिटर आणि पॉलचे एक चर्च आहे.चर्चच्या आतमधे अतिशय सुंदर चित्र्,शिल्प आहेत. हे चर्च सध्या संग्रहालय आहे.येथे रोमानोव्ह राजघराण्यातील लोकांची थडगी आहेत्.त्यात पिटरचे थडगेही आहे.तेथे राजघराण्याचा चित्रमय इतिहासही रंगवलेला आहे.येथे १७६६ साली डच घंटा बसवण्यात आली.येथील घंटागार शहरातील सर्वात उंच ठिकाण आहे.

पिटर आणि पॉलचे कॅथेड्रल

त्रुबेत्स्कोय बास्तीओन -हे किल्ल्यातील जेल आहे.येथे राजघराण्याचे अनेक विरोधक शिक्षा भोगत असत.त्याचबरोबर माक्सीम गॉर्की,लेनिनचा मोठा भाउ यांनीही येथे शिक्षा भोगलेली आहे.येथुन जवळच तोफा आहेत्.दररोज दुपारी १२ वाजता येथुन एक शॉट उडवला जातो.
पिटर्सबर्गचे संग्रहालय-हे संग्रहालय पिटर्सबर्गचा ३०० वर्षाचा इतिहास उलगडते.यात अगदी पिटर्स्बर्गमधील जुन्या इमारती,प्लॅन्स,जुनी उपकरण्,शहराची जुनी चित्रे इत्यादी अनेक गोष्टी आहेत.
पिटर आणि पॉलच्या किल्ल्यातुन १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीमधे विंटर पॅलेसवर तोफांनी हल्ला करण्यात आला होता.

शेवटी आम्ही नौकेतुन शहराची शेवटची सफर करुन धावत पळत रेल्वे पकडली.रेल्वे सुटायच्या अगदी दोन्-तीन मिनिट आधी आम्ही तेथे पोहोचलो होतो.सेंट पिटर्सबर्गमधील अनेक महत्वाची ठिकाणे आम्ही पाहु शकलो नाही.५ दिवस पिटर्सबर्ग बघायला कमी पडतात.१५ ते ३० दिवस असतील तर पिटर्सबर्ग व्यवस्थितपणे बघता येथे.पण आमची ही पिटर्सबर्गची यात्रा खुपच सुंदर झाली.