निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहीला काही तुम्हांकरीता
यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले. आणि गेले ४ वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव येथे म्हणजे सारातोव्ह,रशियात साजरा करतो. या दिवशी एक छोटासा पण माहीतीपुर्ण व मनोरंजक कार्यक्रम आम्ही गेले ४ वर्ष करत आहोत. हा कार्यक्रम फक्त शिवाजी महाराजांशीच संबंधीत असतो. दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्यात आम्हाला यश आलंय हेही मी सांगू इच्छितो.
फोटो पहाण्यास येथे क्लिक करा-http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivajayanti
शिवाजी महाराजांविषयी मराठी माणसाला माहीती असतेच. पण छोटेमोठे तपशील मात्र माहीत नसतात. शिवाय येथे मराठी पुस्तके मिळण्याचे कुठलेही साधन नसल्याने कार्यक्रमासाठी लागणारी माहीती मिळवण्यासाठी दरवर्षी तारांबळ उडते. इंटरनेटवरील बहुतेक माहीती इंग्रजीत आहे व ती फक्त वरवरचीच आहे. तपशीलवार शिवचरीत्र इंटरनेटवर सापडत नाही. त्यामुळे यावर्षी आधीच इंटरनेटवर माहीती शोधण्यास सुरुवात केली. एका शिवभक्तानी 'शिवाजी- द ग्रेट' हे बालकृष्णन यांनी १९४० साली लिहिलेले अतिशय छान पुस्तक पाठवले. पण ते विश्लेशणात्मक असल्याने त्याचा उपयोग फक्त भाषणापुरता होणार होता. संपुर्ण शिवचरित्र मिळणे आवश्यक होते.त्यासाठी शोध चालुच होता. शेवटी माझ्या मोठ्या भावाने शिवचरीत्राची लिंक भारतातुन पाठवली. बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलेले शिवचरीत्र सर्वांनी आवर्जुन ऐकावे असे आहे.आता आमच्याकडे इतिहास आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही होते. त्यावरुन २-३ कथाकथन, १ नाटक,१ भाषण करायचे नक्की झाले. त्यानंतर झकासराव या मायबोलीकराने किल्ल्यांची माहीती असलेले ईपुस्तक पाठवले. त्यावरुन राजगड या किल्ल्यावर फोटो शो करायचा ठरला. शिवाय ३ गाणी म्हणायचे ठरवले.गेले ३ वर्ष आम्ही शिवाजी महाराजांवर प्रसिध्द झालेली अनेक गाणी म्हटली होती पण पोवाडा एकदाही म्हटला नव्हता. यावर्षी तो म्हणायचाच असे ठरले. त्यासाठी किशोर मुंढे या दुसर्या मायबोलीकराने दिलेली लिंक कामास आली. आता आमच्याकडे पोवाडे होते पण ते गाण्यासाठी लागणारी वाद्य नव्हती व पोवाडे म्हणण्याचा सराव असलेला गायकही नव्हता. कारण येथील ४०-५० मराठी विद्यार्थ्यांमधे एकानेही भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले नाही.चित्रपट संगीत गाणारे आहेत. शेवटी त्यांनीच पोवाडा गाण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.
शिवाजी महाराज जेंव्हा आग्र्यात गेले तेंव्हा औरंगजेब बादशहाच्या दरबारातील दृष्य व नंतर वेशांतर करुन राजगड वर जिजामातेंची भेट ही दोन दृष्य नाटकाद्वारे दाखवायची ठरली. तानाजी मालुसुरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग व अफझल खानाचा वध या घटना मागच्याच वर्षी दाखवल्याने यावर्षी मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे,शाहिस्तेखानावर हल्ला यांचे कथाकथन करण्याचे ठरले.
'मराठी पाउल पडते पुढे' , 'हे हिंदु नरसिंहा' व 'वेडात मराठे वीर'ही गाणी गायची ठरली.त्याचप्रमाणे खाडीलकर यांनी १९२० साली गायलेल्या एका पोवाड्याची ऑडीओ फाईल व शब्द मिळाले त्यामुळे एक पोवाडा म्हणने नक्की झाले. पण यापैकी एकही ऑडीओ स्टिरीओ नसल्याने आमच्या श्रीकांत शिंदे या संगीत तज्ञापुढे मोठे आव्हान होते.शेवटी मागे कमी आवाजात गाणे चालू करुन गायकाने गाणे म्हणायचे व जेंव्हा फक्त संगीत असेल तेंव्हा आवाज वाढवायचा असे ठरले. इतर पोवाडे खुप मोठे होते व ते पार्श्वसंगीताशिवाय म्हणनेही अवघड होते. शेवटी शरद मोहळकर या आमच्या मित्राने स्वत:च पोवाडा लिहिला. पण त्या पोवाड्यासाठी गायकही नव्हता व पार्श्वसंगीतही नव्हते.शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यांमधुन काही लुप्स पार्श्वसंगीतासाठी वापरायचे असा प्रयत्न आमचा संगीत तज्ञ २-३ दिवस करत होता पण ते जमले नाही. आदल्या रात्रीपर्यंत पोवाडा कोणी गायचा हेही ठरले नव्हते. त्याचप्रमाणे 'वेडात मराठे वीर' हे गाणे म्हणनारी गायिकाही काही कारणामुळे गाणे म्हणु शकणार नव्हती. त्यामुळे आदल्या दिवशी सांगायच्या गोष्टी जास्त व गायच्या गोष्टी कमी होतात काय अशी भिती वाटू लागली. पण गाणी नसल्यास कार्यक्रम नाही म्हटला तरी कंटाळवाणा आणि फार उपदेशात्मक होतो. त्यामुळे शेवटी पोवाडा व 'वेडात मराठे वीर' हे समुहगानाप्रमाणे म्हणायचे ठरले.
भिंतीवर लावण्यासाठी म्हणुन अभिकेष कोचले या मित्राने शिवाजी महाराजांचे एक मोठे चित्र काढले.आदल्या रात्री होस्टेलमधे मराठीमधे निमंत्रण लावण्यात आले. नाटकाचा सराव दररोज होतच असे. आमच्या नाटकामध्ये जिजामातेच काम करणारी दिव्या शेट्टी ही मुलगी आंध्र प्रदेशची होती,तिला मराठीही बोलता येत नव्हते. हे काम करण्यास काही मराठी मुलींनी नकार दिला तर काही मराठी मुली जिजामाता म्हणुन बरोबर दिसत नव्हत्या.
आणि सोमवार २४मार्चचा दिवस उजाडला. दुपारपासुनच कार्यक्रमाची तयारी सुरु झाली.प्रसाद म्हणुन बासुंदी बनवण्याचे काम कार्यक्रमात काम न करणार्या ५व्या कोर्समधे माझ्याबरोबर शिकणार्या मित्रांनी केले. कार्यक्रमासाठी लागणारे कपडे ,इतर साहित्य जमवण्यात आले. जिथे कार्यक्रम होणार होता त्या कक्षाची सजावट केली,कॉरिडॉर मधे पताका लावल्या.
कार्यक्रमाची सुरुवात शिवपुजनाने झाली.त्यानंतर मी शिवाजी महाराजांचे महत्व थोडक्यात सांगितले. शिवाजी महाराज जगातील सिकंदर,ज्युलिअस सीझर,नेपोलियन व इतर योद्ध्यांइतकेच किंवा कदाचित थोडेसे जास्तच महान होते हे सांगण्यात आले. शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन ब्रिटीश,पोर्तुगिजांनी काढलेले गौरवोद्गार ,शिवाजी महाराजांनी सुरु केलेली रयतवारी पध्दत,शिवकालीन न्यायव्यवस्था तसेच शिवपुर्व मुस्लिम अत्याचारांबद्दल विविध संतांनी काढलेले उद्गार व रामदास स्वामींनी शिवगौरवासाठी लिहिलेले 'निश्चयाचा महामेरु' इत्यादी गोष्टी सांगण्यात आल्या. त्यानंतर विक्रांत ओव्हळ या आमच्या गायकाने अतिशय अवघड असा 'ज्याच्या कबंधानं भुतळी' हा १९२० साली गाण्यात आलेला पोवाडा अतिशय सुंदर पध्दतीने गायला. पोवाडा जवळपास ९० वर्षापुर्वीचा असल्याने रेकॉर्डींग पण अतिशय खराब होते व त्यात असलेल्या खरखर आवाजामुळे एकाही वाद्याचा आवाज नीट येत नव्हता.इंग्रजी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेल्या विक्रांतने खुप कष्ट घेउन तो पोवाडा जसा होता तसा गायला. त्यानंतर अजित साठे या मित्राने मुरारबाजी देशपांडे यांवर आधारीत 'पुरंदरचा वेढा' हा प्रसंग सांगितला. मुरारबाजीने अतिशय कमी सैन्यासकट दिलेरखानास दिलेली झुंज व मुरारबाजींच्या मृत्युनंतरही वेढा चालुच ठेवणार्या मावळ्यांचे पराक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात. त्यानंतर 'मराठी पाउल पडते पुढे' हे गाणे निलेष कसबेकर व सहगायकांनी अतिशय छान रित्या म्हटले. टाळ्यांचा कडकडाट झाला.'हर हर महादेव, जय भवानी,जय शिवाजी' च्या नार्यांनी सभाकक्ष दुमदुमुन गेले. या गाण्याच्या तयारीला अतिशय कमी वेळ मिळाला होता. त्यानंतर विजय फुले याने पावन खिंडीत बाजीप्रभु देशपांडेंनी दिलेली लढत खुलवुन सांगितली. शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांवर असलेले प्रेम व त्यांच्या सैनिकांनी मृत्यु समोर दिसत असतानाही मरेपर्यंत शिवरायांसाठी दिलेला लढा खुपकाही सांगुन जातो.आजच्या स्वार्थी जगात आपल्या प्रजेवर एव्हढ प्रेम करणारा नेता व त्याच्यासाठी स्वतःचा जीव काहीही विचार न करता देणारी प्रजा दोन्हीही मिळण मुश्किल. त्यानंतर आनंद रासने याने राजगड वर आधारीत फोटो शो सादर केला त्यात राजगडचा थोडक्यात इतिहास व तेथे सध्या असलेली प्रेक्षणीय स्थळे याबद्दल फोटोंच्या आधारे माहीती सांगितली. मग रुचिका या १ल्या वर्षाला शिक्षण घेणार्या मुलीने 'हे हिंदु नरसिंहा' हे लता मंगेशकरांनी गायलेले अतिशय अवघड गाणे म्हटले. तिची तब्येत बरी नसतानाही तिने सुरेल गाणे म्हटले. यानंतर शरद मोहोळकर याने सहगायकांबरोबर स्वत: लिहिलेला पोवाडा कुठल्याही वाद्याशिवाय सादर केला. आमच्या कार्यक्रमातील हा सर्वात छान भाग होता. प्रेक्षकांनी पोवाडा चालु असतानाच तालात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. जो पोवाडा कार्यक्रमाच्या ३-४ तास आधीपर्यंत होईल का नाही अशी शंका होती तो पोवाडा कार्यक्रमानंतर सर्वांच्याच लक्षात राहीला. त्यानंतर आमचे नाटक सुरु झाले. नाटकात आनंद सराफ याने शिवाजी महाराजांची भुमिका केली त्याचबरोबर जाधव राजे श्रीकांत,रोहीत व्यवहारे,चिन्मय घोडके व इतर कलाकारांनी काम केले. आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या दरबारात जेंव्हा शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानावर, सार्वभौमत्वावर जेंव्हा आघात झाला त्यानंतर ज्या दरबारात मान खाली घालुन उभे रहावे लागत असे,हळुच बोलावे लागत असे अशा दरबारात शिवाजी महाराज कडाडले व आपला अपमान झाला म्हणुन निघुन गेले यावरुन शिवाराय किती साहसी होते हे दिसुन येते. आपल्या राज्यातुन फक्त १००० सैनिकांनीशी आलेला राजा मुघलांच्या दरबारात कडाडतो आणि बादशहाच्या परवानगीशिवाय निघुन जातो यावरुनच त्याच्या शौर्याची कल्पना येते. मला नाही वाटत की औरंगजेब बादशाच्या दरबारात असे करण्याची दुसर्या कोणी हिम्मत केली असेल. त्यानंतर त्याच आग्र्यातुन सुटुन निघणेही तितकेच अद्भुत!!!डगलसनी म्हटलय की बुध्दिमत्ता व मुस्तद्देगिरी यात शिवाजी महाराजांच्या करंगळीत जितक होतं तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरिरात नव्हत हे अगदी खर आहे. नाटकानंतर 'वेडात मराठे वीर' हे गाणे कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांनी मिळुन म्हटले. प्रतापराव गुजरांच्या साहसाचे या गाण्यात अतिशय नेमके वर्णन केलेले आहे. यानंतर आभार प्रदर्शन झाले ज्यात सर्व कलाकारांना शिवरायांचे स्मरण म्हणुन एक एक प्रकाशचित्र देण्यात आले,प्रसादवाटपानंतर कार्यक्रम संपला.
अनेकदा अमराठी,रशियन विचारतात की तुम्ही हा सण का साजरा करता? आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज किती महान होते. पण या महान राज्याबद्दल अमराठी लोकांना सोडाच पण मराठी माणसालाही पुरेशी माहीती आहे का हा प्रश्नच आहे. काही शिवभक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान महाराष्ट्रातील फक्त १६% लोकांना शिवरायांबद्दल पुरेशी माहीती आहे. जर अशा महापुरुषांबद्दल आपल्याला माहीती नसेल तर स्वाभिमानी,देशाभिमानी,परोपकारी,साहसी,सुसंस्कृत,निस्वार्थी,अन्यायाविरुध्द लढणारा समाज बनण शक्य आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे. स्वार्थासाठी फसवा, खोटेपणा करा,चोरा, ओरबाडा पण ते करताना सापडू नका अशी तर मुल्य बनत नाही आहेत ना???का मुल्य,संस्कृती बद्दल बोलणे म्हणजे पुराणमतवादी अशी व्याख्या होत आहे???शेतकर्यांच्या शेतांपासुन आपल्या सैनिकांना दुरुन जायला सांगणारे कारण घोड्यांच्या टापांनी शेत उध्वस्त झाले तर शेतकरी उध्वस्त होईल म्हणुन काळजी घेणार्या शिवारायांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात व नेते काहीही करत नाहीत हे बघुन चिड येते. शिवकालीन न्यायव्यवस्थेपासुन आजची न्यायव्यवस्था पुढे आहे का मागे???आपले राजकीय नेते एकमेकांना शह देण्यास जी बुध्दिमत्ता आणि कुटनीती वापरतात ती ते देशाच्या निरनिराळ्या समस्या सोडविण्यास एकत्र येउन का वापरत नाहीत्???आम्ही आमच्या कार्यक्रमात दरवर्षी सांगतो की शिवाजी महाराज खुपच महान होते,आम्हाला शिवाजी महाराज बनवायचा नाहीये पण आमच्या कार्यक्रमातुन प्रेरणा घेउन एकजरी मावळा बनला तरी आम्ही आमचा प्रयत्न सफल मानु. पण मावळा बनण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आपल्यात आहे का???
चिन्मय नंदकुमार कुलकर्णी.