Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Thursday, March 27, 2008

गणपती आले रशियाला!!!!!


समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम सदा निरालम्बसमाधिगम्यं तमेकदन्तं शरणं व्रजाम: -समाधिस्थ योग्यांच्या हृदयात तुच प्रकाश म्हणुन विराजतोस आणि विलंबाशिवाय समाधित तुझी अनुभुती होउ शकते अशा एकदंत गणेशा तुला मी शरण येतो.
इथे फोटो पहा- http://picasaweb.google.com/chinya1985
आमच्या होस्टेलमधे आम्ही गेली चार वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहोत. रशियामधील सारातोव्ह नावाच्या शहरात मी पाचव्या वर्षात मेडिकलचे शिक्षण घेत आहे. चार वर्षापुर्वी आम्ही ३-४ जणांनी गणपती बसवला होता. मराठी मुलेही तेंव्हा बोटावर मोजण्याइतकी होती. पण या वर्षी मात्र गणेशोत्सव मोठा करायचाच असे खुप आधीच ठरवले होते. उत्सवाच्या तयारीला सुरुवात सुट्टित भारतात जाण्यापुर्वी म्हणजेच जुनच्या शेवटच्या आठवड्यात झाली होती. भारतातुन काय काय कोणी कोणी आणायचे हे तेंव्हाच ठरवले . दररोज आरती ,प्रसाद ,गणपती अथर्वशीर्षाचे पठण आणि एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा असे ठरले. इथे भारतीय फार नसल्याने भारतीय वस्तू मिळणारी दुकानेही नाहित त्यामुळे गणेशोत्सवाची जवळपास सर्व खरेदी भारतातुन करावी लागली. आमच्या इथे दक्षिण भारतिय जास्त आणि त्यांचा ओढा जास्त करुन ख्रिश्चन धर्माकडे आहे त्यामुळे त्यांना व इतरांना बोलावण्यासाठी निमंत्रण पत्रिका छापुन आणायचे ठरले. भारतात गेल्यावर सर्वात आधी निमंत्रण पत्रिका छापल्या त्यानंतर सजावटीच्या आणि प्रसादाच्या सामानाची खरेदी केली आणि प्रवासात काय होईल सांगता येत नाही म्हणुन भारतातुन २ मुर्ती आम्ही घेउन आलो.
इथे आल्यावर ८-१० जणांनी मिळुन गणपती होस्टेलमधील सभागृहात बसवायचा की एखाद्याच्या खोलीमधे बसवायचा यावर चर्चा झाली .शेवटी रशियन माणसे सभागृहात आपले नियम पाळणार नाहित म्हणुन मोठ्या खोलीत गणपती बसवायचा ठरले. भारतातुन येताना थर्माकॉल आणने शक्य नव्हते त्यामुळे उत्सवाच्या ४-५ दिवस आधी त्याचा शोध घेणे चालु झाले. इथल्या लोकांना थर्माकॉल सजावटीसाठि वापरता येतो हे माहितच नव्हते त्यामुळे तर आणखीनच पंचायत! जिथे थर्माकॉल दिसले ते इतके जाड होते की त्यातुन कुठलीच सजावट शक्य नव्हती. शेवटी टाइल्स , वॉलपेपर्स मिळणार्‍या दुकानात पातळ थर्माकॉल मिळाले मात्र ते फारच पातळ असल्याने त्यांचा वापरही मर्यादीत करता येणार होता. तिच वेळ चमकी शोधताना आली. जिथे जिथे चमकी सापडे ती कॉस्मेटिक म्हणुन वापरता येणारी किंवा डींकात मिसळलेली होती. शेवटी त्यालाही पर्याय मिळाला. गणरायाला 'विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता' म्हणतात . म्हणजे आधी तोच विघ्न आणतो आणि मग भक्तांच्या प्रार्थनेला साद देउन तोच ती विघ्ने दूर करतो याची आम्हाला प्रचिती आली.
पुर्ण होस्टेल १० दिवस गणेशमय झाले पाहिजे असे आम्हाला वाटत होते. खास भारतिल 'लुक' यावा म्हणुन आम्ही भारतातुनच १००० च्या आसपास पताका घेउन आलो होतो. त्या पताका दोर्‍याला चिकटवायचे काम मात्र इथे करायचे होते. ते केल्यानंतर पाठदुखी हा प्रकार काय असतो हे कळले. खळ वगैरे नसल्याने 'फेविस्टिक्'ने हे काम करावे लागले. त्यानंतर पुर्ण रुम सजावी म्हणुन भारतातुन आणलेल्या पोस्टर्सवर सजावटिचे काम केले. प्रत्येक पोस्टरला ड्रॉइंगपेपरवरती रंगीत क्रेपपेपर लावून त्यावर महिरप करण्यात आला. त्यानंतर गणपती कमळात बसवायचा म्हणुन थर्माकॉलच्या सहाय्याने कमळ बनवले. १३ तारिख आली पण गणपतीचे कोलाज आणि ओंकारस्वरुप गणपती बनवण्याचे कामही सुरु झाले नव्हते. कोलाजसाठी लागणारे फोटो तर इंटरनेटवरुन मिळाले होते मात्र आमच्यापैकी कुणाकडेही प्रिंटर नसल्याने त्यालाही सुरुवात झालेली नव्हती. मोठा ओंकारस्वरुप गणपती (म्हणजे ६-७ थर्माकॉल शीट्स) बनवण्यास आधी तो मोठ्या ५-६ ड्रॉइंगपेपरवर काढण्यात आला ,मग थर्माकॉलवर ट्रेस करुन ,तिथे काढून तो कापण्यात आला व नंतर रंगवण्यात आला. त्यासाठी २ दिवस एक मित्र ८-८ तास गुडघ्यावर बसुन काम करत होता. कोलाज बनवताना अजुन एक विघ्न आले-प्रिंटरची व्यवस्था झाली पण तो रंगित नव्हता . अजुन एक विघ्न म्हणजे गणेशोत्सवाच्या ३ दिवस आधी मी आजारी पडलो पण त्यावेळी काम इतके राहिले होते की झोपायलाही पुरेसा वेळ मिळत नसे शिवाय दिवसा कॉलेजला जाणे अत्यावश्यक होते. पण गणरायाच्या कृपेने दरवेळी ७-८ दिवस राहणारे दुखणे २-३ दिवसातच संपले.
जास्तित जास्त लोकांना येता यावे म्हणुन पुर्ण रुम रीकामी करण्यात आली . १४-१५ तारखेला तर श्वास घेण्यासही वेळ नव्हता .सर्व सजावट या दिवशी करण्यात आली तसेच होस्टेलच्या पुर्ण कॉरीडॉरला पताका लावण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. १५ तारखेला प्रसादासाठी १३० च्या आसपास मोदक व शिरा करण्यात आला. पहिल्या दिवशी जवळजवळ १०० लोकांनी दर्शन घेतले. गर्दी होईल हे माहित होते मात्र इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. आमचे कॉलेज सकाळीच असल्याने पहाटेच उठुन स्नान करुन पुजा करावी लागत असे. गणेशोत्सवाच्या तयारीमुळे रात्री २-३ वाजता झोपुन परत ३-४ तासांनी उठावे लागत असे. दिवसभर कॉलेज असल्याने दिवसा झोपणे शक्य नव्हते. परत आल्यावर पुजेची तयारी ,प्रसाद बनवणे यामुळे क्षणभर उसंत मिळत नसे. गणेशोत्सवाच्या आधी सजावटीत वेळ गेल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही सुरु झाली नव्हती. त्यामुळे त्या तयारीसाठी वेळ द्यावा लागत होता.
१६ तारखेला बेसनाचे लाडु हा प्रसाद होता . जवळजवळ ५० मुळे पुजेसाठी आले होते. ३ आरत्या , घालिन लोटांगण, मंत्रपुष्पांजली यात सर्वजण रममाण होत. त्यानंतर गणपतीबाप्पा मोरया च्या गजरात सर्व जण उत्साहात येत. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण होत असे. त्या दिवशी हरे कृष्ण म्हणजेच इस्कॉनच्या भक्तांनी येउन किर्तन केले. अनेक जण भारतिय असुनही किर्तनाला प्रथमच आले होते. जवळपास १ तास चाललेल्या किर्तनात सर्वजण इतके रममाण झाले की झाले वेळेचेही भान राहिले नाही. सर्व रुम जणुकाही वैकुंठात परिवर्तित झाली होती. बर्‍याच भारतियांना असा अनुभव प्रथमच आला होता. भगवानांच्या नामातली गोडी अनेकांना जन्मानुजन्माच्या प्रतिक्षेनंतर अनुभवण्यास मिळाली.
१७ तारखेला नारळाच्या वड्या हा प्रसाद आणि गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ असा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यानंतर २ दिवस अष्टविनायक दर्शन आणि हलवा,खीर असा प्रसाद होता. ६व्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम होता. मोठ्या उत्साहात 'अष्टविनायका तुझा महिमा','प्रथम तुला वंदितो',आणि हिंदी 'मोरया' ही गाणी विद्यार्थ्यांनी म्हटली. प्रसादासाठी बासुंदी होती. त्यानंतरच्या २ दिवशी प्रजापती ब्रह्मकुमारीच्या येथील प्रतिनिधींनी ध्यानाचा कार्यक्रम घेतला,एका रशियनने भारतिय शास्त्रिय संगीताचा कार्यक्रम घेतला.खिरापत व राजगीर्‍याचा शीरा असा प्रसाद दाखवण्यात आला. ९व्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा इस्कॉनच्या भक्तांनी किर्तन घेतले. जवळजवळ २ तासांच्या किर्तनाला पहिल्यापेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्या भक्तांनीही सर्वांसाठी प्रसाद बनवुन आणला होता. आम्ही भोपळ्याचा शीरा हा प्रसाद केला होता.
१०व्या दिवशी विद्यालयाची डीन ,इतर शिक्षक,तसेच येथील टी.व्ही.चे पत्रकार येणार असल्याने खास कार्यक्रम ठेवण्यात आला. प्रसादासाठी गुलाबजाम्,नारळाचे लाडु तसेच दक्षिण भारतिय पध्दतीचा चण्याचा प्रसाद बनवण्यात आला. सांस्कृतीक कार्यक्रमात गणेश व गणेशोत्सवाची माहिती, 'तु वेडा कुंभार्','चिक मोत्याची माळ' ,'मोरया' या गीतांचे गायन तसेच 'राधा कैसे ना जले ' वर नृत्य तर गणेशजन्मावर एक छोटस नाटक बसवण्यात आल होत. पुर्ण गणेशोत्सवादरम्यान अनेक रशियन पाहुण्यांनी भेट दिली आणि आम्ही केलेल्या सजावटीला दाद दिली. अनेकांचा विश्वासच बसत नव्हता की रशियात अशा प्रकारचा सोहळा आणि सजावट होऊ शकते. गणपती असा का हा तर प्रत्येकाचा आवडता प्रश्न होता. मला नाही वाटत की आम्ही दिलेला प्रसाद कोणी रशियन विसरु शकेल.
विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला प्रत्येक रुममधे जाउन प्रसाद देण्याचे ठरले होते. ३००हुन जास्त मोदक,शीरा आणि मसाला दुध बनवण्यात आले होते. पुजा झाल्यावर आणि अथर्वशीर्षाची २१ आवर्तने झाल्यावर नाचत ,गात आणि 'गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या'च्या नार्‍यांनी सर्व होस्टेलचा परिसर दुमदुमुन गेला. संध्याकाळी ७ नंतर व्होल्गा नदीवर ५० च्या आसपास भारतिय पोषाख घातलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती विसर्जन केले नंतर पुर्ण होस्टेलला प्रसाद देण्यात आला.
हा सर्व सोहळा आम्ही ठरवलेल्या सोहळ्यापेक्षा कितीतरी पटीनी चांगला झाला होता. बहुतेक पहिल्यांदाच आमच्या होस्टेलमधील मराठी माणसे एकत्र आली होती. अनेक अडचणी येऊनही उत्सव व्यवस्थित पार पडला. हा सर्व उत्सव यशस्वी बनवण्यात अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावला, आळस न करता पडेल ते काम वाटेल त्या वेळी पुर्ण केले. विसर्जनानंतर सर्वजणांनी एकत्र येउन भोजन केले.सर्व जण आनंदी आणि समाधानी होते.
आत्तापर्यंत अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा केला पण हा गणेशोत्सव संपुर्ण आयुष्यात विसरणे शक्य होणार नाही. कुठलेही काम करताना होणारा आनंद त्याच्या पुर्तीनंतर होणार्‍या आनंदापेक्षा कितीतरी मोठा असतो असे ऐकले होते, वाचले होते पण यावेळी त्याची प्रतिची आली. पण कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड झाला की दुग्धशर्करा योग होतो. आमच्यासाठी हा तसाच योग होता.१५ दिवस पुर्ण भारावुन जाउन काम चालू होते. फक्त एकच विचार मनात येत असे तो म्हणजे गणपती!!परवा विसर्जन झाले आहे पण काल आणि आजचा दिवस संपता संपत नाही आहे. काहीतरी महत्त्वाचे जणुकाही हरवले आहे. मन भरुन येते,कंठ दाटून येतो. ज्या रुममधे गणपती होता ती रुम पुर्वीसारखी केली आहे.आता तिथे पाय ठेववत नाही. पहाटेच जाग येते ,जातायेता पाय त्या रुमकडे वळतात. काल रात्रीच होस्टेलमधल्या पताका काढल्या. पुर्ण कॉरिडॉर भकास दिसत आहे. असे क्षण मोजकेच असतात हवे तेंव्हा ते येत नाहित आणि गेल्यानंतर आठवणीने नकळत डोळ्यात पाणी आणतात. बहुतेक यालाच जीवन म्हणतात.
-चिन्मय कुलकर्णी

4 comments:

Anonymous said...

tuzhe ganesh utsavache varnan pan vachle,tumhi loka kautukala patra ahat,kharach great ahat itkya kami resources madhe tumhi itke kahi kartay.keep it up

siddh bhide

Anonymous said...

khupach sundar

Swanand

Akshay kashid said...

chan ree

mala maza gharat la ganpati aadwla

sundar aahe tum chi kalpana

Anonymous said...

vaa!! apratim