Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Wednesday, September 17, 2008

सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!



एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति: प्रचोदयात्
आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला. हे आमच्या सारातोव्ह मेडीकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमधील गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष होते.पहिल्या वर्षी जेमतेम ५-६ जणांनी मिळुन गणेशोत्सव साजरा केला होता पण आता आमच्या गणेशोत्सवाचे रुपांतर एका मोठ्या उत्सवात झाले आहे व आमचे एक छोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे.मागच्या वर्षीचा गणपती बराच मोठा करण्यात आम्हाला यश आले होते.यावर्षी त्याहुन पुढे जाण्याचा निश्चय होता.त्यासाठी भारतातच सजावट तसेच प्रसाद याचा एक आराखडा बनवण्यात आला व भारतातुन येताना आवश्यक असलेले सामान आणले.त्याचबरोबर गणेशोत्सवासाठीच्या निमंत्रणपत्रिकाही छापुन आणल्या.येथे सजावटीचे सामान घेणे शक्य नव्हते कारण येथे भारतीय वस्तुंची दुकाने नाहीत व येथील सजावटीचे सामान म्हणजे वाढदिवसाच्या सजावटीसारखे दिसते.
यावर्षी राजवाड्यासारखी सजावट करायचे ठरवले होते. त्यासाठी भारतातुन थर्माकॉलचे मोठे सिंहासन आणले.त्यानंतर येथील दुकानांमधे सीलींगची सजावट करण्यासाठी असणारे थर्माकॉलचे साहीत्य आणुन ते एकमेकांना जोडुन ,रंगरंगोटी करुन त्याचे खांब बनवण्यात आले.त्याचबरोबर ६ गणपतीची चित्रे काढण्यात आली व त्या चित्रांच्या बाजुने मखर बनवण्यात आले.त्याचबरोबर लायटिंग व सीलिंगची सजावट करण्यात आली. होस्टेलमधील सर्व कॉरीडॉरना पताका लावण्यात आल्या. हे सर्व करण्यासाठी जेमतेम १ दिवस व २ रात्री मिळाल्या. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी जिव तोडुन काम केले. २ तारखेला सर्वांना पत्रिका देण्यात आल्या व नोटिस बोर्डवर सर्वांना निमंत्रण व सहभागासाठी विनंती करण्यात आली. ३ तारखेला दुपारी पुजा सुरु झाली. एकीकडे पुजा सुरु झाली होती पण सजावटही पुर्ण झाली नव्हती.त्यामुळे तेही काम एकीकडे चालु होते.त्याचबरोबर प्रसादही बनवण्याचे काम सुरु होते. पहील्या दिवशी मोदक ,शिरा,पंचामृत्,फळे हा प्रसाद होता.जवळपास २०० मोदक बनवण्यात आले होते.साधारण संध्याकाळी ६ पर्यंत सर्व काम झाले.एकीकडे पुजा चालुच होती. साधारण ७ च्या दरम्यान आरती झाली.आरतीला जवळपास ७० मुले होती.'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने पुर्ण होस्टेल दुमदुमुन गेले.
दुसर्‍या दिवशीपासुन संध्याकाळच्या आरतीची सुरुवात शंखनादाने होत असे.शंखाचा आवाज ऐकल्यावर सर्व मुले आरतीला येत.मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आमच्याकडे दररोज आरती,गणपती अथर्वशीर्षाचे पठन्,प्रसाद ,सांस्कृतिक कार्यक्रम होत.पण त्याचबरोबर यावर्षी अजुन २ गोष्टी आम्ही करु लागलो. पहीली म्हणजे गणेशाच्या नावाचा जप सकाळच्या आरतीनंतर होत असे व त्याचबरोबर संध्याकाळी विविध परंपरांमागचे म्हणजे नमस्कार का करतात्,घंटा का वाजवतात्,प्रदक्षिणा का घालतात इत्यादींमागची भावना,महत्व याची माहीती दररोज सांगण्यात येत असे. ४ तारखेला म्हणजे दुसर्‍या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामधे गणेशोत्सव सुरु करणार्‍या लोअमान्य टिळकांबद्दल एक छोटेसे भाषण झाले.त्यात टिळकांच्या चरीत्राचा आढावा,गणेशोत्सव्,शिवजयंती सुरु करण्यामागचा उद्देश सांगण्यात आला. त्याचबरोबर त्या दिवशी 'देहाची तिजोरी' हे गाणे सादर केले.प्रसादासाठी या दिवशी बेसनाचे लाडु होते.५ तारखेला आमच्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे इस्कॉनच्या भक्तांच्या किर्तनाचा कार्यक्रम होता.मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळाली.या दिवशी प्रसाद म्हणुन फ्रुट सॅलड बनवले होते.६ तारखेला प्रश्नमंजुषा झाली.यात मुख्यत्वे धर्माशी संबंधित प्रश्न होते.या दिवशी प्रसाद म्हणुन केळीचे शिक्रण होते.
७ तारखेला रविवार असल्याने सकाळच्या पुजेलाही बर्‍यापैकी गर्दी होती.या दिवशी सकाळी गणपती स्तोत्राची २१ आवर्तने झाली.या संध्याकाळी ट्रेडिशनल डे होता.त्याचबरोबर गणपतीच्या काही कथा सांगण्यात आल्या व 'मल्हार वारी' हे गाणे एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदररीत्या गायले.या दिवशी गाजराचा हलवा हा प्रसाद करण्यात आला होता.८ तारखेला 'Ganesha Outside Hinduism' या विषयावरील माहीतीपुर्ण भाषण झाले.त्याचबरोबर 'उदे ग अंबे उदे' वर नृत्य व 'सनईचा सुर' या गीताचे समुहगायन झाले.या दिवशी प्रसाद म्हणुन गुलाबजाम बनवले होते.९ तारखेला 'महाराष्ट्राची संत परंपरा' याविषयावर भाषण्,एक नृत्य व एक गाणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. या दिवशी शेवयाची खिर हा प्रसाद बनवला होता.१० तारखेला फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. जवळपास २० जणांनी वेगवेगळी वेषभुषा केली होती.यात विविध देविदेवता,ऐतिहासिक व्यक्ती यांचा समावेष होता.याचबरोबर आमच्या होस्टच्या होस्टिंगने या कार्यक्रमाला वेगळीच मजा आणली.या दिवशी भोपळ्याचा हलवा हा प्रसाद होता.११ तारखेला ध्यानधारणा व एका विद्यार्थ्याने स्वतः गणपतीवर लिहिलेला पोवाडा हे सांस्कृतिक कार्यक्रम होते.या दिवशी लस्सी व फळांचा प्रसाद दाखवण्यात आला.
१२ तारखेचा कार्यक्रम अविस्मरणीय होता.आपल्या मराठी भाषेत म्हणतात की 'साधु संत येता घरा तोचि दिवाळी दसरा'.त्याप्रमाणे यादिवशी आमच्या कार्यक्रमाला भक्तिब्रिंग गोविंद स्वामी महाराज आले होते.याच दिवशी आमच्या शहरात जगन्नाथाची रथयात्रा होती . अशा प्रकारे दुग्धशर्करा योग जुळुन आला होता. आम्ही विद्यार्थ्यांची रथयात्रेलाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर संध्याकाळी स्वामीजींनी किर्तन केले व सर्वांना भारतिय संस्कृतीचे महत्व पटवुन सांगितले. हा कार्यक्रम खुपच छान झाला.या दिवशी तांदळाच्या खिरीचा प्रसाद दाखवण्यात आला.१३ तारखेला 'सेंटर ऑफ श्री चिन्मोय' च्या लोकांनी येउन बंगाली भाषेतील काही भजने सादर केली.त्याचबरोबर एका विद्यार्थ्याने 'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धिमही' हे गाणे सादर केले व याच दिवशी २ नृत्याचे कार्यक्रमही झाले.त्याचबरोबर 'रांजणगावाला महागणापती' हे समुहगानही झाले.या दिवशी नारळाचे लाडु व लस्सी बनवली होती.त्याचबरोबर गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धाही ठेवण्यात आली होती. जवळपास १० गणपतीची अतिशय सुंदर चित्रे स्पर्धेसाठी आली होती.त्यावर प्रेक्षकांनी मतदान केले व विजेता निवडुन दिला.विजेत्याला व इतर सहभाग घेणार्‍यांना पारितोषिक वितरण याच दिवशी करण्यात आले.
१४ तारखेला विसर्जनाचे काम खुपच मोठे होते. जवळपास ४०० मोदक बनवायचे होते व ३० लिटर मसाला दुध बनवायचे होते.दर वर्षी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला आम्ही प्रसाद देतो.त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आरतीला येत त्या सर्वांसाठी म्हणजे जवळजवळ १०० विद्यार्थ्यांसाठी विसर्जनानंतर स्नेहभोजन ठेवले होते. हे सर्व बनवण्याचे मोठे काम कार्यकर्त्यांवर होते. अगदी सकाळपासुन सर्वजण कामाला लागले होते ते काम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले.एकीकडे स्वयंपाकाचे काम चालु असताना दुसरीकडे पुजा व अथर्वशीर्षाची ५४ आवर्तने झाली.संध्याकाळी ७ वाजता आरती झाली.त्यानंतर वाजतगाजत आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या घोषणांसकट गणपती व्होल्गा नदिवर विसर्जनासाठी नेण्यात आले.जवळपास ६० जण विसर्जनासाठी आले होते.विसर्जनानंतर पुर्ण होस्टेलला मोदक व मसाला दुध हा प्रसाद देण्यात आला व पुजेला येणार्‍यांचे स्नेहभोजन झाले.
विसर्जनानंतरचे १-२ दिवस सर्वच कार्यकर्त्यांसाठी फारच खराब जातात.दहा दिवस पुर्ण जीव तोडुन काम केलेले असते,स्वतःच्या हातानी आणि मोठ्या कष्टानी जी सजावट केलेली असते ती काढावी लागते.अभ्यास्,क्लासेस्,लेक्चर्स सांभाळुन हे सगळे उभे करणे व दहा दिवस चालवणे ही खुप मोठी गोष्ट आहे असे मला वाटते.इतर वेळी सर्वजण स्वतःच्या आयुष्यामध्ये गुंतलेले असतात ते सर्व विनातक्रार एकत्र येतात व एकत्र येउन काम करतात .ही गोष्ट आपण गरज पडल्यास आपापसातली भांडण विसरुन एकत्र येउ शकतो व काहीतरी विधायक कार्य करुन दाखवु शकतो हा विश्वास निर्माण करते.आता परत सर्वांची दिनचर्या पुर्वव्रत होउ लागली आहे,पण कुठेतरी काहीतरी खटकतय्,काहीतरी नाहीये,काहीतरी हरवलय याची भावना मनात आहे.गणपतीच्या इतर दिवशी उत्साहानी नाचणारी मंडळी विसर्जनाला नाचु शकली नाहीत.माझे तर हे येथील गणेशोत्सवाचे शेवटचे वर्ष होते.वर्षातील सर्वात अविस्मरणिय असे क्षण गणेशोत्सवात येतात्.पण आता हे परत होणार नाही.पुढच्या गणेशोत्सवात कुठे असेल माहीत नाही पण इथे होतो तसा गणेशोत्सव तिथे होईल का नाही शंकाच आहे. रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!!
चिन्मय कुलकर्णी

11 comments:

Chinmay 'भारद्वाज' said...

Excellent initiative and very admirable effort.
Congratulations to all students.

I hope students will continue the Utsav in coming years.

Unknown said...

वाह वा. छान वाटले वाचुन. या निमीत्ताने एकत्र येतात हे खूपच छान. हा उत्सव असाच पुढे चालू राहो ही सदिच्छा.

Anonymous said...

Chinmay..

chan! tuzya ya kamat bappa satat tuzya pathishi asatatach.. pan tu jya goshtisathi russiala gela aahes tyat tula bappa bharghos yash detil yaat vadach nahi..

Anonymous said...

sundar apratim lihile aahes chimya.
-Swanand

Anonymous said...

चिन्मय...
ग्रेट. आपल्या देशापासून एव्हढ्या दूर राहून तुम्ही जे काही साधलंय त्याच्यासाठी हार्दिक अभिनंदन.

मी देववादी नाही पण मला उत्सव आवडतो. मला तुमचा सगळ्यांचा हेवा वाटतोय.

Mandar

Anonymous said...

वाहवा !!!!!!!!वाहवा!!!!

rahul

Anonymous said...

कमाल केली तुम्ही लोकांनी. अगदी दणक्यात साजरा केलात गणेशोत्सव.

Anonymous said...

वा.

हा खरा गणेशोत्सव.

सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, विविध गुण दार्शन

हे सगळे खूप पूर्वी आम्ही करत असू . आत नुसता धांगडधिंगा आणि बाजारूपणा झाला आहे.

तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.

श्रीकांत सरमळकर

Anonymous said...

हे सर्व सुंदर आहे, खूप परिश्रम घेऊन मंडळीने कार्यक्रम उत्साहात केला आहे, हे उल्लेखनीय.

एक गोष्ट सुचवावीशी वाटते. मूर्ती साधी ब्राँझ अथवा ऍलॉयची पूजावी, तिचे विसर्जन न करता, नुसते 'टोकन' पाण्यात बुचकळून तिला परत आणावी. दर वर्षी हीच मूर्ती पुजावी.

प्रदीप

Anonymous said...

मीपण अमेरीकेत जिथे राहते तिथे भारतीय कमी आहेत. गणपती फक्त १ /२ घरात बसवला जातो. मी पण बसवला होता. विसर्जनाचा प्रश्न मलाही पडला होता. इथे विनेबागो नावाचा खुप मोठा तलाव आहे. पण विसर्जनाला परवानगी काढावी लागेल का? कोणी पाहिले तर आक्षेप घेईल का? पोलिस आले तर काय करतील? असे अनेक प्रश्न होते. पण हिय्या करून संध्याकाळी उशीरा अंधार पडल्यावर बाहेर पडलो. विसर्जनाची आरती घरुनच करून निघलो. तलावाचा एक निर्मनुष्य किनारा गाठला. हळुच पाण्यात खोलवर गेलो आणि मुर्ती विसर्जित केलि.

भारतात जोरजोरात आरत्या म्हणत, जोशात केलेल्या विसर्जनाची खुप आठवण आली

Anonymous said...

चिन्मय वाचून खुप बरे वाटले.

ऋचा