Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, November 4, 2008

जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना.

खालील लेख हितगुज ऑनलाईन दिवाळी अंक २००८ मधे प्रसिध्द झालेला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू
उभयांनी दोष उभयांचे खोडावे
द्वेषासी दुष्ट रुढींसी सोडावें
सख्यासी आईच्यासाठी जोडावें
स्वातंत्र्यवीर सावरकर

वरील ओळींमधून सावरकर 'समस्त हिंदू एकमेकांचे बंधू आहेत' हे सांगतात पण हिंदू समाजास लागलेला सर्वात मोठा शाप म्हणजे 'जात' आहे. जर समस्त हिंदू बंधूंची एकजूट करायची असेल तर ही 'जात' संपवणे आवश्यक आहे. आणि हिंदूंची एकजूट करणे हेच हिंदुत्वाचे लक्ष्य आहे. मग हिंदुत्वाचा एल्गार करणार्‍या सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या हिंदुत्ववाद्यांनी याबद्दल काय भूमिका घेतली व काय कार्य केले याचा थोडासा विचार करु.

स्वातंत्र्यवीर सावरकर
'हिंदुत्व' हा शब्दच ज्यांनी दिला आणि आधुनिक हिंदुत्व ज्यांनी एका अर्थाने सुरु केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. ज्या काळात देशात अस्पृश्यता होती, देशावर अनेक अंधश्रध्दा, कालबाह्य रुढी-परंपरांचा प्रभाव होता तेव्हा सावरकरांसारख्या अस्सल बुद्धिवाद्याने, विज्ञानवाद्याने आणि हिंदुत्ववाद्याने त्यावर अखंड प्रहार केले. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल म्हणून त्यांनी ते विचार मांडणे सोडले नाही. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले. या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी यांना भटास बोलावू नका असे सांगितले. त्याचबरोबर काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्याची खिल्ली उडवली. पण अजूनही अशी 'महासंमेलने' आपल्याकडे आयोजित होत आहेत आणि ती करण्यात अनेकांना 'गर्व' आहे यावरून सावरकरांना अपेक्षित असलेला समाज किती दूर आहे हे लक्षात येते. जाती मोडण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे यावे हे ही त्यांनी सांगितले.


सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजिल भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्‍या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. 'सावरकरांनी मनु:स्मृती जाळली नसली तरी तिचे विचार मात्र जाळले असेच म्हणावे लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'Annihilate the Caste' हीच शिकवण सावरकरांनी दिली. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला त्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात यावी असे सावरकर म्हणत. त्यानंतरच्या दहा वर्षात अस्पृश्यता संपवली नाही तर अजून शंभर वर्ष त्याला लागतील असेही सावरकरांनी सांगितले जे बर्‍याच प्रमाणात खरे आहे असे दिसून येते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या २०० वर्षात झाले नाही तितके काम येत्या २ वर्षात करायचे असा आदेश दिला होता. सावरकर प्रखर विज्ञानवादी होते. शुद्धीच्या वेळी गंगामाईचे पाणीही शिंपडायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था पाळण्यात दोष सर्वांचा असला तरी गेल्या ८-१० दशकात तरी अस्पृश्यतेसारखी राष्ट्रविघातक रुढी पाळून चातुर्वर्णिक स्पृश्यांनी एक राष्ट्रघातक पाप केले आहे असे ते म्हणतात. सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ते सनातनास अपरिवर्तनीय सत्य न मानता सत्यास अपरिवर्तनीय - सनातन मानत. जात्युच्छेदनासाठी त्यांची शिकवण फार महत्वाची आहे. पण हिंदुत्ववाद्यांकडून त्यांच्या विचारांकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. नवतरुण वर्ग सावरकरांच्या विचारांनी प्रभावित नक्की होऊ शकेल. गरज आहे फक्त एका सक्षम नेतृत्वाची. हिंदुत्ववाद्यांमधे जात्युच्छेदनाच्या कामातील मानबिंदू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शेवटच्या कालखंडात सावरकरांनी सांगितले होते की 'माझी मार्सेलिसची उडी विसरली तरी चालेल पण माझे रत्नागिरीतील कार्य विसरु नका'. हिंदुत्वासाठी, राष्ट्रवादासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकीसाठी जात्युच्छेदन सर्वात महत्वाचे आहे हे सावरकरांनी बरोबर ओळखले होते. आजकाल आपले समर्थक दूर जातील म्हणून फक्त विरोधकांवरच हल्ला करणारे लोक आहेत. त्यामुळेच ते यशस्वी 'राजकीय' नेते आहेत तर सावरकर 'विचारवंत, प्रबोधक व समाजसुधारक' ठरतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमीच मनुवादी म्हणून टीका केली जाते. त्यांचे याबाबतचे धोरण मलातरी क्लिष्ट वाटते. बरेच स्वयंसेवकही याबाबत गोंधळलेले वाटतात. याबाबत गोळवलकर गुरुजींचा विचार करावा लागेल. श्रीगुरुजींच्या 'विचारधन' मध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. त्यात ते सांगतात की जातीव्यवस्था आपल्या विकासाच्या आड आली आहे याला काही पुरावा नाही उलट जातीव्यवस्थेमुळे आपली एकता टिकवण्यासाठी मदतच झाली आहे.त्याचबरोबर ब्राह्मण म्हणजे मुख, क्षत्रीय म्हणजे हात, वैश्य म्हणजे मांड्या आणि शुद्र म्हणजे पाय वगैरेही ते विचारधन मध्ये सांगतात. पण अस्पृश्यतेच्या विरुध्द भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे.'अस्पृश्यता सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे नाव आहे' असे ते म्हणत.त्याचबरोबर १९६९ साली उडुपी येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सभेत 'न हिंदू पतितो भवेत! हिंदव: सहोदरा सर्वे!!' म्हणजे कोणीही हिंदू दलित नाही, पतित नाही, अस्पृश्य नाही. तर बंधू आहे. असा प्रस्ताव पारित करण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय यांनीही आपल्या १९६५ सालच्या भाषणात विराट पुरुषाच्या विविध अवयवांची थिअरी दिली आहे पण त्याचबरोबर पुढे म्हटले आहे की 'पण आम्ही जातींमधील भांडणांचे विरोधक आहोत', म्हणजे थोडक्यात संघाच्या या जेष्ठ नेत्यांना जातीव्यवस्था मान्य होती पण जातीभेद मान्य नव्हता, जातीजातीतील भांडणे मान्य नव्हती. पण जातच नको असे स्पष्ट ते सांगत नाहीत. कोणे एके काळी जातीव्यवस्था जन्मावरून ठरत नसे, जातीव्यवस्थेमुळे समाज एकसंध रहाण्यास पूर्वी मदत झाली वगैरे संघाचे लोक सांगत असतात. अरे पण कोणे एके काळी माणूस उघडा नागडाच रहात असे आणि कच्चे मांस खात असे. पण त्याचा आजशी काही संबंध आहे का? विराट पुरुषाचे विविध अवयव हे एकीसाठी पूरक एकेकाळी नक्कीच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरही १९३६ साली लिहिलेल्या एका लेखात हे मान्य करतात. त्यात ते लिहितात "शरिराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्याने ते एका शरिराचा भाग नाही असे होऊ शकत नाहीत. तद्वतच, क्षत्रिय बाहूपासून, ब्राह्मण मुखापासून, वैश्य मांड्यांपासून, शूद्र पायांपासून उत्पन्न झाले असले तरी ते एका शरिराचा भाग आहेत हे दाखवणे हा पुरुषसूक्ताचा उद्देश आहे असे आम्हाला वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. श्रमविभागाने झालेला भेद निरर्थक आहे ही शिकवण लोकांना देऊन ऐक्याचा ठसा लोकांच्या मनावर उठवावा या हेतूने पुरुषसूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे."पण ब्राह्मणांनी याचा नेमका उलटा अर्थ लावला असेही बाबासाहेब पुढे लिहितात.

त्यामुळे जुन्या काळी वर्णव्यवस्था उपयुक्त ठरलीही असेल पण सध्या ती कालबाह्यच नव्हे तर राष्ट्रघातक झाली आहे हे सांगायला संघाचे नेते टाळतात असे वाटते. शिवाय संघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला अभिजन वर्ग दुखावला जाऊ नये म्हणून संघ सवर्णांचा व मुख्यत्वे ब्राह्मणांचा यात दोष आहे हे ही सांगायला कचरतो असे वाटते. पण याचबरोबर इतरही नेत्यांची वक्तव्ये लक्षात घ्यायला हवीत. बाळासाहेब देवरस यांनी ‘If untouchability is not wrong, nothing in the world is wrong’ असे सुस्पष्ट विधानही केले आहे. त्याचबरोबर २ वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांना बोलावून त्यात सरसंघचालक के.सुदर्शन म्हणाले, 'आम्ही आमच्या शाखेमध्ये कधीच जातीयवाद पाळत नाही. दलित हे आमच्याच रक्ताचे आहेत पण काही कारणांनी चुकीच्या आचरणाने अस्पृश्यता अशा लोकांवर लादली गेली, जे आमच्याच धर्माचे भाग आहेत' पण ज्या जोराने संघ राममंदिर, रामसेतू वगैरे मुद्दे मांडतो त्या जोराने तो जात्युच्छेदनाविरोधी भूमिका नक्कीच घेत नाही. त्याचबरोबर संघाच्या विविध कार्यक्रमांना शंकराचार्यांचे घोळके असतात ज्यामुळे हे काय जात्युच्छेदन करणार अशी शंका साहजिकच येते. संघ दलितांचे उपनयन अथवा दलितांना पुजारी बनवणे वगैरे काम करते पण आंतरजातीय विवाह लावणे संघाला सहज शक्य आहे पण संघ ते कार्य करत नाही (मलातरी माहीत नाही). याबद्दल परिवाराच्या एका वेबसाईटवर या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे की आमचा आंतरजातीय विवाहास विरोध नाही पण जर ते लावले तर मागच्या पिढीतील लोक रागावतील व हिंदुत्वापासुन दूर जातील. पण जात्युच्छेदन करायचे असल्यास कोणी ना कोणीतरी दुखावला जाणारच आहे. दुखावले जाणार्‍याची काळजी संघाने करण्याची गरज नाही कारण संघ ही राजकीय पार्टी नाही. प्रबोधन करायचे असल्यास विरोध हा स्वाभाविक आहे. संघ अनेकदा प्रतिगामी भूमिका घेतो असेही दिसते. म्हणजे संघाच्या एका नेत्याने मुलाखतकार मुलीने जीन्स घातली म्हणून दाखवलेली नाराजी अथवा प्रमोद महाजन फाईव्ह स्टार कल्चर आणायचा प्रयत्न करत आहेत म्हणून धुसफूस इत्यादी अनेक छोट्यामोठ्या गोष्टींनी संघ मध्ययुगीन कालखंडात घेऊन जाईल अशी भीती अनेकांना वाटते. याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. सध्या संघ ही एकमेव हिंदुत्ववादी संघटना आहे जी देशभर पसरलेली आहे व जिच्याकडे हजारो स्वयंसेवक आहेत व जात्युच्छेदनाचे कार्य तेच व्यवस्थितपणे करु शकतात.

शिवसेना
कडव्या व जहाल हिंदुत्वाचा पुकार करणार्‍या शिवसेनेचा विचार याबाबत करणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी शिवसेना ही एक संघटनाच नाही तर एक राजकीय पार्टी आहे यामुळे त्यांच्या याविषयीच्या कार्यात अनेक मर्यादा आहेत. राजकीय पक्ष कुठलीही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत ज्यामुळे मतदार दुखावतील. त्यामुळे समाजप्रबोधनास अनेक मर्यादा राजकीय पक्षाला येतात. शिवसेना ही हिंदुत्वाच्या क्षेत्रात उतरलेली शेवटची संघटना आहे. पण जात्युच्छेदनाचे कार्य इतर हिंदुत्ववाद्यांनी सुरुही केले नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ते मोठ्या प्रमाणात सुरू केले होते. जुन्या काळातील जातीपाती, अनिष्ट रुढी, परंपरा यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. शिवसेनाप्रमुखांकडे त्यामुळे हे गुण येणे स्वाभाविक होते. सेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली तेव्हाच आपले ब्रह्मवाक्य दिले होते की ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सर्व वाद गाडा आणि सर्वांची एकजूट करा. या भूमिकेवर चालण्यास ते बर्‍याच अंशी यशस्वी ठरलेले आहेत. शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे जातीपातीची छुपी राजकारणे, पायखेची होत नाही. जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक मागासपणावर आरक्षण द्यावे ही मागणीही त्यांनी अनेक वर्षं लावून धरली आहे. त्याचबरोबर सेनाप्रमुखांनी गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती आहेत. या दोन सोडल्या तर तिसरी जात नाही अशी जातीव्यवस्थेविरुध्द स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देऊनही त्यांच्यावर 'मनुवादी' असा ठपका बसलेला नाही.


हिंदुत्वाचा झेंडा घेउन जेव्हा शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरले तेंव्हा 'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मला करायचे नाही' हे त्यांनी ठासून सांगितले. त्याप्रमाणे वागणूकही ठेवल्याने ओबीसींनी शिवसेनेला भरपूर पाठिंबा दिला. हिंदू धर्माच्या पालनाच्या बाबतीत त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेले आहे असे दिसते. तुमच्या मनाला पटेल त्या पध्दती अवलंबा, पण त्या व्यक्तिगत स्तरावर. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे प्रतिकार व जहाल पद्धतीचे आहे. सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन, त्यांची जातपात गाडून एक बलाढ्य राष्ट्रवादी शक्ती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता जी शक्ती राष्ट्रद्रोह्यांवर वरवंटा फिरवेल. त्याबद्दल बाळासाहेब म्हणतात की 'या हिंदुस्तानावर आणि हिंदूंवर जो कोणी वाकडी नजर टाकेल त्याला झोडणारं माझ हिंदुत्व आहे. मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर धर्मांध, देशद्रोही मुस्लिमांना बडवणारा हिंदू हवा आहे.'सावरकर आपल्या 'हिंदुत्व' पुस्तकात हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहे हे स्पष्ट सांगतात. बाळासाहेबांचे हिंदू धर्मातील विविध धारांपासून दूर असणारे हिंदुत्व सावरकरांना अपेक्षित असलेल्या हिंदुत्वाशी साधर्म्य दाखवणारे आहे. वरती सावरकरांनी शुध्दीच्या वेळी गंगेचे पाणीही शिंपडू नका असे सांगितल्याबद्दल दिले आहे तशाच प्रकारे शिवसेनाप्रमुखांबद्दलची एक घटना देतो. बाळासाहेब कांबळे यांना ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता. ते शिवसेनाप्रमुखांकडे आले आणि त्यांनी तसे सांगितले. तिथे इतरही हिंदुत्ववादी मंडळी होती त्यांनी सांगितले की आता व्रतवैकल्ये करा, होमहवन, यज्ञयाग वगैरे करा,जेवणावळी वगैरे वाढा. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उद्गारले "कसल्या जेवणावळी वाढताय?? त्याला गंध लावा आणि 'जय हिंद' म्हणायला सांगा की झाला तो हिंदू." म्हणजे यज्ञयाग, व्रतवैकल्ये चुकीची आहेत असे नाही. पण त्यात हिंदुत्व अडकवू नका. अर्थातच आपले समर्थक मतदार दुखावतील म्हणुन अनेकदा प्रखर भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही. त्यामुळे शिवसेनेवर तशी मर्यादा आहे. शिवसेनेने या विषयावर मोठी आंदोलने वगैरे केलेली नाहीत पण त्यांच्या पक्षाचे नियमन व आचरण नक्कीच राजकीय पक्षास स्वागतार्ह आहे. जात्युच्छेदनासाठी संघाने सेनेपेक्षा जास्त काम केलेले असेलही पण संघ ही एक संघटना आहे व सेना ही एक राजकीय पार्टी आहे हे विसरुन चालणार नाही. शिवसेनेने जात्युच्छेदनाचा विचार नक्कीच दिलेला आहे पण समाजाचे प्रबोधन केले आहे म्हणणे नक्कीच धाडसी ठरेल.

सध्याची परिस्थिती व भविष्य
सध्या जातीपातींमधील संघर्ष वाढीला लागला आहे. देशात लोक आपली ओळख म्हणजे जातच सांगतात. जातनिर्मूलनाचे कार्य न झाल्याने जातींचे समूहच बनले आहेत. आमचे 'सोशल इंजिनीअरींग'ही जातीच्याच नावाने होते. विविध जाती स्वतःची 'महासंमेलने' भरवून काय साधत आहेत कोण जाणे? राजकारणातही व्यक्तीची जात बर्‍याच गोष्टी ठरवून जाते. आजही अस्पृश्यता पूर्णपणे संपलेली नाही व खैरलांजीसारखी मानवतेला काळिमा फासणारी प्रकरणे घडत आहेत. विविध जातीच्या नेत्यांनी स्वतःच्या समाजाचे भले करण्यापेक्षा स्वतःचेच 'भले' करुन घेतले आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मूलनासाठी सर्व आयुष्य झटणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळही आजकाल जातीपुरती सीमित झाली आहे. सवर्णांमधे 'आम्ही कुठल्याही आरक्षणाशिवाय यशस्वी झालो' असे म्हणत श्रेष्ठभाव निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर अभिजन म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असा नवजातीवादही येऊ लागला आहे. त्यामुळे जात्युच्छेदनाची आज नितांत गरज आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याची, विचारवंताची, समाजसुधारकाची आवश्यकता आहे. चर्चिलने एकदा म्हटले होते की 'India is not a nation. It's a collection of tribes.' हे वक्तव्य धादांत चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण जात्युच्छेदनाचे काम जर जोरात झाले नाही तर चर्चिलचे वक्तव्य खरे ठरण्याची भीती नक्कीच आहे. आपल्या देशाचे हित यातच आहे की आपण आपली जातपात विसरून एकत्र आले पाहिजे. हिंदुत्ववाद्यांनी यासाठी कार्य करणे जरुरीचे आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षवादी हे कार्य बिलकुल करणार नाहीत. कारण हिंदू समाज एकत्र व्हावा असे त्यांना वाटतच नाही. तर हिंदूंच्या एकजुटीच्या ते विरुद्ध आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादाला चांगले दिवस यायचे असल्यास जात्युच्छेदनाला अग्रक्रम हिंदुत्ववाद्यांनी द्यायला हवा. जात्युच्छेदनाशिवाय हिंदूंची एकजूट ही कल्पना वेडगळपणाची आहे.

चिन्मय कुलकर्णी

संदर्भ-
'सावरकर-एक अभिनव दर्शन', savarkar.org, golwalkarguruji.org, sanghpariwar.org