Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, May 26, 2009

आमची पिटर्सबर्गची यात्रा

मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबरचे युध्द जिंकले आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे शहर वसवले गेले.पिटरला यात खुप अडचणी आल्या आणि त्याला अनेकांनी विरोधही केला.पण तरीही पिटरने हे शहर वसवले. पिटर स्वतः अतिशय हौशी होता.त्याला स्थापत्यशास्त्र व नौका बनवण्यातही रस होता.पिटरची दुसरी बायको कॅथेरीन पण अतिशय हौशी होती.तिने अनेक कलावंत,शिल्पकार्,स्थापथ्यकार यांच्याद्वारे शहर सजवले.पिटर्सबर्ग हे शहर नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरल्याने या शहरातील लोकांचा पर्यटकांकडे पहाण्याचा दृष्टीकोण अतिशय सकारात्मक आहे.कुठल्याही व्यक्तीला काहीही विचारल्यास तो नक्की त्याचे उत्तर देतो.आम्हाला तर अनेकदा अनेक लोकांनी स्वतःहुन विचारपुस करुन मदत केली.अनेक वृध्द स्त्रीया आम्ही रस्त्यात वाट पहात असताना स्वतःहुन सांगुन जात कुठे जायचे वगैरे.येथील लोकांवर तसे संस्कारच आहेत म्हटल्यास हरकत नाही.पिटर्सबर्ग हे शहर त्या मानानी बर्‍यापैकी शांत,cool आहे.मॉस्कोसारखी गर्दी,धावपळ पिटर्सबर्गमधे नाही.पिटर्सबर्गची मेट्रो जगातली सर्वात खोल मेट्रो आहे.सर्वात खोल स्टेशन १०५ मिटर्स जमिनीच्या खाली आहे. आम्ही ५ तारखेला रेल्वेने पिटर्सबर्गकडे निघालो.२५ तासांच्या सफरीनंतर ६ तारखेला दुपारी तेथे पोहोचलो.आम्ही बुकिंग केलेल्या होस्टेलला शोधण्यात थोडा वेळ गेला.पण १-२ जणांनी स्वतःहुन नकाशा पाहुन आम्हाला मदत केली.लगेच तयार होउन आम्ही फिरायला निघालो.


फोटो येथे बघु शकता-
http://picasaweb.google.ru/chinya1985/StPeterburgPhotos#


नेव्हस्कीय प्रॉस्पेक्ट
पहील्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेव्हस्कीय प्रॉस्पेक्टवर फिरलो.येथील जवळपास सर्व इमारती सुंदर व काहीतरी इतिहास असलेल्या आहेत्.त्यात कॅथेरीनची बाग,अलेक्सांदरचे थिएटर्,कॅथरीनचा पुतळा,मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय,चॉकलेट संग्रहालय,गोस्तीय द्वोर,समर गार्डन्स्,समर पॅलेस या गोष्टी बघण्यासारख्या आहेत्.उलित्सा रोसी म्हणजेच रशियाचा रस्ता अतिशय सुंदर आहे.या रस्त्याच्या दोन बाजुंना दोन इमारती आहेत ज्या सारख्या आहेत्.दोन्हीही इमारतींची उंची आणि रुंदी ६६फुट आहे तर त्यांची लांबी ६६० फुट आहे.या इमारतींमधे राणीची नृत्यशाळा होती.लोमोनोसोव्ह चौकापासुन (स्क्वेअर) अलेक्शांडरच्या थिएटरकडे बघतानाचे दृश्य अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी अनेक सुंदर छोटेमोठे पुल आहेत्.त्याच्यातली विविधता पण खुप सुंदर आहे.एका पुलावर चार बाजुंना चार पुतळे आहेत्.त्यात एक घोडेस्वार प्रथम खाली पडतो आहे आणि नंतर तो उठुन त्या घोड्याला आटोक्यात आणतो हे अतिशय सुंदर दाखवले आहे.

उलित्सा रोसी

आर्ट स्क्वेअर-मिहायलोव्स्की पॅलेसच्या समोर हा चौक आहे.येथे रशियातील सर्वात लोकप्रीय कवी पुश्कीनचा पुतळा आहे.मिहाइलचा महल १८२५ साली बांधण्यात आला होता.तेथे आता रशियन वस्तुंचे संग्रहालय आहे.जवळपास ३,८०,००० चित्र व वस्तु तेथे आहेत.
स्पास ना क्रोवी किंवा सेव्हियर ऑन स्पिलड ब्लड-मार्च १८८१ साली अलेक्सांडर दुसरा याची बाँबने हत्या करण्यात आली.ज्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला त्या ठिकाणी त्याचा मुलगा अलेक्सांडर तिसरा याने एक चर्च उभे केले.म्हणुन त्याला वरील नाव पडले.मॉस्कोतल्या रेड स्व्वेअर वरील बॅसीलच्या कॅथेड्रलची हुबेहुब प्रतीकृती म्हणुन हे चर्च प्रसिध्द आहे.येथे पिटर आणि कॅथरीनच्या डुप्लिकेट्सबरोबर आम्ही फोटो काढले.

स्पास ना क्रोवी

इंजीनिअर्स्कीय झामोक म्हणजेच इंजिनिअर्स किंवा मिहाइलचे कॅसल-१८व्या शतकाच्या मध्यावर पिटरची मुलगी एलिझाबेथचा महाल बांधण्यात आला. नंतर त्याचे मिहाईलच्या किल्ल्यात रुपांतर झाले.याच्या सर्व बाजुंनी आधी पाणी होते.उचलले जाणार्‍या पुलावरुन येथे ये-जा होत असे.'पॉल पहील्या'ने सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली होती.पण 'अलेक्सांडर पहील्या'च्या मारेकर्‍यांनी पॉलची येथे हत्या केली .पॉल त्या किल्ल्यात रहायला येउन तेंव्हा जेमतेम ४० दिवस झाले होते.गुप्त खोल्यांमुळे मारेकर्‍यांना पॉलला शोधुन काढणे खुप अवघड गेले.१८३८ साली येथे मिलिटरी इंजीनीअरींग स्कुल सुरु झाले.पहील्या पॉलने १८०० साली किल्ल्याच्या समोर पिटरचा पुतळा उभारला.येथुन जवळच मार्बल पॅलेस्,पावलोव्स्किय बॅरॅक्स आहेत.
कझानस्कीय सबोर म्हणजे कॅथेड्रल ऑफ लेडी ऑफ कझान-ही अतिशय भव्य इमारत आहे. ही १८११ साली बांधण्यात आली.कॅथेड्रलच्या आतमध्ये कझानच्या राणीचा पुतळा आहे.तर कॅथेड्रलच्या बाहेर कुतुझोव आणि बार्कले यांचे पुतळे आहेत. नेपोलियनचा पराभव करणार्‍या सैन्याचे हे दोघे सेनापती होते.त्यातील कुतुझोव्हचे थडगे कॅथेड्रलच्या आतमध्ये आहे

कझान कॅथेड्रल
या आणि इतर अनेक इमारती बघुन रात्री ११ नंतर आम्ही होस्टेलला पोहोचलो.सेंट पिटर्सबर्गमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपुर चालण्याची तयारी ठेवावी.पाय दुखत आहेत म्हणुन इथे चालत नाही.बस,टॅक्सी,कार यातुन फिरण्यात मजा नाही कारण नेव्हस्कीय प्रॉस्पेक्टवरील जवळपास सर्वच इमारती बघण्यासारख्या आहेत्.मुलींनी हाय हील्स घालु नयेत.

द्वोर्स्काया प्लोशाद किंवा पॅलेस स्क्वेअर -दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही पॅलेस स्क्वेअरला गेलो.हा चौक फार सुंदर आहे.या चौकाच्या मध्दभागी अलेक्सांदरचा स्तंभ आहे.पहिला अलेक्सांदरने नेपोलियनचा पाडाव केल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ १८३४साली बांधण्यात आला.ग्रॅनाईटने बनवलेला हा स्तंभ अशा प्रकारचा जगातला सर्वात उंच स्तंभ आहे.त्याची उंची ४७.५मिटर आणि वजन जवळपास ५००टन आहे.स्तंभावर एका परी बनवली आहे तीचा चेहरा अलेक्सांदरशी जुळणारा आहे असे म्हणतात.मागच्या शतकात हा स्तंभ पडेल का अशी भिती निर्माण झाली होती.दुसर्‍या महायुध्दात या परीसरात बराच बाँबवर्षाव झाला होता पण आश्चर्यकारक रीत्या या स्तंभाला काही झाले नाही.या स्तंभाच्या एका बाजुला 'जनरल स्टाफ बिल्डींग' आहे. ही इमारतही अतिशय सुंदर आहे.त्याच्या मध्यभागी एक ब्राँझचा रथ आहे.स्तंभाच्या दुसर्‍या बाजुला विंटर पॅलेस आहे.

द्वोर्स्काया प्लोशाद

झिम्नीय द्वारेत्स किंवा विंटर पॅलेस्.किंवा एर्मिताझ(hermitage)-ह्या इमारतीमध्ये १८३२ पासुन १९१७ पर्यंत रशियन त्सार रहात असत. ही अतिशय भव्य इमारत आहे व त्याच्या वरती अनेक शिल्पकाम केलेले आहे.येथे सध्या एर्मिताझ म्हणजे Hermitage हे जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय आहे.ज्यात तीस लाखाहुनही अधिक वस्तु(art works) आहेत.जर तुम्ही प्रत्येकाच्या समोर एक मिनिट जरी थांबलात तरीही संपुर्ण संग्रहालय बघायला तुम्हाला ४ वर्ष लागतील्.कॅथेरीन राणिने १७६४ साली स्वतःचा व्यक्तीगत संग्रह खुला केला होता.त्यानंतर यात भर पडत पडत गेली व आता हे प्रचंड संग्रहालय बनले आहे.येथे युरोपातील विविध देशांमधील चित्रे,शिल्प व इतर गोष्टी आहेत.लिओनार्डो दा विंची,मिचेल एंजेलो,पिकासो यांच्या चित्रांपुढे सर्वात जास्त गर्दी असते.दा विंचीची २ चित्रे आणि मिचेल एंजेलोची २ शिल्पे येथे बघायला मिळाली.त्याचबरोबर जगातल्या अनेक मोठ्या चित्रकारांची,शिल्पकारांची कारागीरी येथे आहे.इटॅलियन आणि फ्रेंच विभाग अवश्य पहावाच असा आहे. मला सेंट पिटर्सबर्गमधील सर्वात आवडलेले ठिकाण हेच आहे.येथे भारतासाठीही एक विभाग आहे.त्यात मुघलकालीन शस्त्रास्त्रे,टिपुचे आसन्,गौतम बुध्द्,राम्,महिषासुरमर्दिनी,जैन तिर्थंकारा,गणपती यांच्या मुर्त्या आहेत.नोव्हिय एर्मिताज किंवा न्यु हर्मिटेज हे १८४२ साली बनवण्यात आले.याच्या सुरुवातीलाच अ‍ॅटलांटसचे दहा भव्य पुतळे आहेत जे जणुकाही इमारतीला उचलुन धरत आहेत्.प्रत्येक पुतळा बनायला एक वर्षाचा कालावधी लागला होता.

एर्मिताझ मधील लिओनार्डो दा व्हिंचीचे 'मॅडोन्ना अँड द चाइल्ड'

इसाक्स्कीय साबोर किंवा सेंट आयसॅक्स कॅथेड्रल-ही इमारत अतिशय सुंदर आहे.त्याची उंची १०१ मिटर इतकी आहे.१७१० साली सर्वात पहील्यांदा येथे चर्च बनवण्यात आले.त्यानंतर हळुहळु ते वाढत वाढत जाउन सध्या अतिशय मोठे झाले आहे.सध्याची इमारत १८१८ साली बांधण्यास सुरुवात झाली व ४० वर्षानंतर ती इमारत पुर्ण बांधुन झाली.सध्या आतमध्ये संग्रहालय आहे.या इमारतीच्या मध्यभागी एक घुमट आणि बाजुला ४ घुमट आहेत्.इमारत बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने वापरण्यात आले आहे.चर्चच्या आतमध्येही सोने वापरले आहे व शिल्पकाम केले आहे.एकुण ५००किलो सोने या इमारतीत वापरण्यात आले आहे.आतील शिल्पकामही भव्य आणि सुंदर आहे.इमारतीच्या वरच्या भागापर्यंत पायर्‍यांनी चढत जाता येते व सर्व शहर येथुन सुंदर दिसते.ह्या इमारतीचे वजन ५५ मजली इमारतीइतके आहे.

आयसॅक कॅथेड्रल

ब्राँझ हॉर्समन अथवा म्योद्निय व्साद्विक-शहर ज्यानी वसवल त्या पिटर पहील्याचा हा पुतळा पिटर तिसर्‍याच्या बायकोने म्हणजे कॅथेरीनने वसवला.तीचे मुळ जर्मन होते. १२ वर्षांच्या कारगिरीनंतर हा पुतळा १७८२ साली पुर्ण झाला. हा पुतळा अतिशय प्रसिध्द आहे.यात पिटर घोड्यावर बसलेला आहे आणि त्याच्या घोड्याच्या मागच्या पायांजवळ एक मोठा साप आहे.पिटरच्या आधुनिकतेचा आणि सुधारांचा विरोध करणार्‍या लोकांना हा साप दर्शवतो.तरीही त्या सापाला पायदळी तुडवुन पिटर त्याची वाटचाल पुढे करतोय असे यात दाखवले आहे.ग्रॅनाईटच्या एका मोठ्या खडकावर हा पुतळा उभारण्यात आला आहे.त्या खडकाला Thunder Stone म्हणतात.हा खडक पिटर्सबर्गपासुन ६किमी अंतरावर सापडला होता.तो तिथुन सध्याच्या ठिकाणि आणन्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला.काहींच्या मते १५००टन वजन असलेला हा खडक जगातील इतक्या अंतरावर एकसंध हलवण्यात आलेला सर्वात मोठा खडक आहे.रशियातल्या सर्वात प्रसिध्द कवी पुश्किनने १८३३ साली या पुतळ्याला बघुन 'ब्राँझ हॉर्समन' नावाची कविता लिहिली. ही कविता रशियनमधील सर्वात सुंदर कवितांपैकी एक आहे.या सुप्रसिध्द कवितेमुळे हा पुतळा या नावाने ओळखला जाउ लागला.या कवितेत राज्यकर्त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या गरजा यांच्यातली तफावत दाखवली आहे.जनतेसाठी पुरातुन वाचणे मुश्किल झाले आहे आणि राज्यकर्ते उत्तमोत्तम स्थापत्य बनवण्यात मग्न आहेत असे या कवितेचा नायक म्हणत असतो.

ब्राँझ हॉर्समन

नॉच्नोय पिटेर्बुर्ग अथवा रात्रीचे पिटर्सबर्ग-पिटर्सबर्गमधे एक खासीयत ही आहे की येथे नदीवर अनेक छोटेमोठे जवळपास ३४२ पुल आहेत्.या शहराला त्यामुळेही 'उत्तरेकडील व्हेनिस' म्हटले जाते.यातील ११ पुल रात्री १ ते सकाळी ४ पर्यंत उघडतात. हे दृश्य आम्हाला पहायचेच होते.त्यामुळे आम्ही रात्रीच्या पिटर्सबर्ग ची सैर करायचे ठरवले.त्यात रात्री दिसणारे पिटर्सबर्ग बसने दाखवण्यात आले व त्याचबरोबर रात्री १ ते २.३० पर्यंत एका नौकेतुन उघडणारे पुल दाखवण्यात आले. हा अनुभवही छान होता.कारण सर्व शहरातील इमारतींचे ,पुलांचे विविध प्रकारच्या प्रकाश व्यवस्थेचे अतिशय सुंदर दृश्य दिसुन येते.यात आम्ही वासीलेयस्कीय ओस्त्रोव्ह्,स्फिंक्स,१२ विद्यालये या नविन गोष्टी बघितल्या.त्याचबरोबर पिटरचे लाकडी घरही बघितले.जेंव्हा शहरात काहीही नव्हते,तेंव्हा हे पहीले घर बांधण्यात आले होते.आधी ते पिटरच्या उंचीपेक्षाही कमी होते,नंतर त्याची उंची वाढवण्यात आली.त्याचबरोबर १८१७ ची ऑक्टोबर क्रांतीच्या शेवटाची जेथुन सुरुवात झाली ती 'आव्रोरा किंवा Aurora' युध्दनौकाही बघितली.यातुन एक ब्लॅंक शॉट राजवाड्याच्या दिशेने करण्यात आला.जो क्रांतीकारकांना संकेत होता.मग कम्युनिस्ट क्रांतीकारकांनी विंटर पॅलेसमधे शिरुन राजघराण्यातील सर्वांचा खुन केला.त्याचबरोबर रात्री नौकेतुन आम्ही उघडणार्‍या पुलांचे विहंगम दृश्य पाहीले.या सैरेमधे आमची गाईड चांगलीच दैववादी निघाली.तिने शहरातील अनेक इच्छा पुर्ण करणारी स्थळे दाखवली.मी माझ्या पुढील महत्वाच्या परीक्षांची सोय लावायचा प्रयत्न केला.पिटर्सबर्गमधील एक अतिशय छोट्या पण छान असलेल्या पुलाबद्दलही लिहितो.ग्रीफॉन स्टॅत्यु असे त्याचे नाव आहे.यातील पक्ष्याचे पंख सोन्याने मुलामा दिलेले आहेत्.रात्रीतुन पॅलेस स्क्वेअर सर्वात सुंदर दिसते असे मला वाटते.पिटर्सबर्गला जाणार्‍या प्रत्येकाने ही सैर जरुर करावी असे माझे मत आहे.सकाळी ६ वाजता मेट्रो सुरु झाल्यावर आम्ही अतिशय थकलेल्या अवस्थेत होस्टेलमधे पोहोचलो.

उघडणारे पुल.

त्सार्स्कोए सीलो किंवा पुश्किन म्हणजेच राजांचे नगर-आद्ल्या रात्री पुर्ण जागल्याने दुसर्‍या दिवशी आम्ही अतिशय थकलेल्या अवस्थेत उशीरा बाहेर पडलो.त्या दिवशी त्सार्स्कोए सीलो अथवा पुश्किन बघायला जायचे होते.येथे ३ महाल आहेत्.पहीला कॅथेरीनचा महाल्,दुसरा आलेक्सांदरचा महाल आणि तिसरा पावेलचा महाल आहे.त्याचबरोबर महालाच्या बाहेर सुंदर बागा आहेत्.आम्ही उशीरा पोहोचल्याने आम्हाला कॅथेरीनचाच महाल पहाता आला.पण हा महाल अतिशय मोठा आणि सुंदर आहे.येथे एक अँबर रुम होती.अतिशय महाग अशा अँबरनी आणि सोन्यानी एक पुर्ण खोली सजवण्यात आली होती.त्याच्या सुंदरतेमुळे त्याला जगातले ८वे आश्चर्यही म्हटले जायचे.अतिशय महाग असे ६ टन अँबर यासाठी वापरण्यात आले होते.दुसर्‍या महायुध्दाच्या काळी नाझी सैन्याने या महालाचा ताबा घेतला होता. नाझींना तेथुन बाहेर हाकलल्यावर अँबर रुममधील अँबर गायब होते.आजपर्यंत हे कळले नाही की ते सर्व अँबर कुठे गेले.त्यानंतर परत ही अँबर रुम बनवण्यात आली आहे.त्याचे फोटो काढायला परवानगी नाही तरीही आम्ही गपचुप काही फोटो काढले.महालासमोरील बागही सुंदर आहे.त्यात अनेक पुतळे आहेत.त्यानंतर आम्ही काही काळ महालापुढील बागेत घालवुन परतलो.

कॅथेरीनचा महाल

पितेर्गोफ -नंतरच्या दिवशी दुपारी आम्ही पितेर्गॉफला गेलो. हे शहरापासुन एक तासाच्या अंतरावर आहे.बसने जाताना वाटेत राष्ट्रपतीचा महाल दिसतो.राष्ट्राध्यक्ष जेंव्हा पिटर्सबर्गला येतात तेंव्हा या महालात रहातात्.पितेर्गॉफचे वैशिष्ठ्य म्हणजे तेथे असलेले कारंजे आहेत्.अनेक छोटेमोठे कारंजे येथे आहेत्.त्याचबरोबर पिटरचा महालही आहे.फिनलंडच्या खाडीच्या काठावर हे वसलेले आहे.आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी तेथे दुसरे महायुध्द जिंकल्याबद्दलचा विजयदिवस साजरा केला जात होता.तेथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतिषबाजी झाली.येथील मुख्य कारंज्यांचे कॉम्प्लेक्स छान आहे.मध्यभागी सॅमसनने एका सिंहाचा जबडा उघडला आहे असा पुतळा आहे.सिंहाच्या जबड्यातुन एक मोठा कारंजा आहे.रशियाने स्वीडनवर मिळवलेल्या विजयाचे हे प्रतिक आहे.कारण सिंह हे स्वीडनचे कुल-चिन्ह (कोट ऑफ आर्म्स) आहे.मुळ सॅमसनचा पुतळा नाझी जर्मन फौजांनी लुटला होता.त्याचबरोबर याच्या आजुबाजुला अनेक पुतळे आणि कारंजे आहेत्.पिटेर्गॉफची खासीयत ही आहे की त्याच्यातील कारंज्यांना कुठेही पंप लावलेले नाहीत.नैसर्गिक झर्‍यांमधुन पाणी साठवले जाते आणि उंचीच्या फरकामुळे कारंजे बनवण्यात आले आहेत्.सॅमसनचा कारंजा ज्याचे पाणी २० मिटर उंच उडते तो ४ किलोमिटरच्या खास aqueduct ने बनवण्यात आला आहे.पितेर्गॉफमधील पिटरचा महाल व गुहांमधील कारंजेही अप्रतिम आहेत.या दिवशी परतताना आम्हाला पाउस लागला.गडबडीत आम्ही उलट्या दिशेने जाणार्‍या बसमधे चढलो आणि एका तासाऐवजी तीन तास प्रवास केला.मग 'तंदुर' नामक भारतीय रेस्टॉरंटमधे गेलो (कारण आमच्या शहरात भारतीय रेस्टॉरंट नाही).'तंदुर' रेस्टॉरंट हे आमच फसलेल प्रकरण होत. त्या संध्याकाळी आम्ही रहात असलेल्या हॉस्टेलमधे आम्हाला एक पुर्व जर्मनीत रहाणारा जर्मन मनुष्य भेटला.तो बिचारा एकदम भावुक झाला होता कारण त्या दिवशी जर्मनीविरुध्द जिंकलेल्या युध्दाचा उत्सव चालु होता्आ जर्मन असल्याने त्याला त्याच्या देशाला हरवल्याबद्दलचा आनंदही टोचत होता आणि कम्युनिस्टांनी त्यांच्यावर नंतर केलेल्या राज्याचेही दु:ख होते.

पितर्गॉफ

पित्रोपावेल्स्कीय क्रेपस्त किंवा पिटर अ‍ॅण्ड पॉल फोर्ट्रेस.-शेवटच्या दिवशी आम्ही पिटर आणि पॉलचा किल्ला बघायला गेलो.हा किल्ला हे पिटरने सेंट पिटर्सबर्गमधे बनवलेली पहीली इमारत होती.त्याची पायाभरणीही त्यानेच केली होती. हा किल्ला एका वेगळ्या बेटावर बांधण्यात आला आहे.त्या बेटाला जॉनच्या पुलाने जोडले जाते्आ पुल लाकडी आहे.१७०३ ते १७४० पर्यंत हा किल्ला बांधला जात होता.पिटरच्या भव्य दरवाज्यातुन किल्ल्याच्या आत जाता येते.या दरवाज्यावर पिटरच्या पराक्रमाच्या कथा कोरलेल्या आहेत.

पिटर आणि पॉलचा किल्ला

पिटरचा विवादास्पद पुतळा-इतर ठिकाणी जरी पिटरच्या पुतळ्यात त्याला एखाद्या हिरोसारखे बनवले असले तरीही तो दिसायला फारच जेमतेम होता असे ऐतिहासिक पुरावे सांगतात.तो खुपच उंच,लुकडा,इतर शरीराशी तुलना केल्यास फारच लहान डोके असलेला होता.त्याला बघुन शत्रुच नाही तर पिटर्सबर्गचे रहीवासीही घाबरुन जात.त्याचा असा एक पुतळा १९९१ साली बनवण्यात आला व तो येथे बघितला जाउ शकतो.

पिटरचा विवादास्पद पुतळा

पित्रोपावेल्स्कीय साबोर किंवा पिटर आणि पॉलचे कॅथेड्रल-किल्ल्याच्या आतमध्ये पिटर आणि पॉलचे एक चर्च आहे.चर्चच्या आतमधे अतिशय सुंदर चित्र्,शिल्प आहेत. हे चर्च सध्या संग्रहालय आहे.येथे रोमानोव्ह राजघराण्यातील लोकांची थडगी आहेत्.त्यात पिटरचे थडगेही आहे.तेथे राजघराण्याचा चित्रमय इतिहासही रंगवलेला आहे.येथे १७६६ साली डच घंटा बसवण्यात आली.येथील घंटागार शहरातील सर्वात उंच ठिकाण आहे.

पिटर आणि पॉलचे कॅथेड्रल

त्रुबेत्स्कोय बास्तीओन -हे किल्ल्यातील जेल आहे.येथे राजघराण्याचे अनेक विरोधक शिक्षा भोगत असत.त्याचबरोबर माक्सीम गॉर्की,लेनिनचा मोठा भाउ यांनीही येथे शिक्षा भोगलेली आहे.येथुन जवळच तोफा आहेत्.दररोज दुपारी १२ वाजता येथुन एक शॉट उडवला जातो.
पिटर्सबर्गचे संग्रहालय-हे संग्रहालय पिटर्सबर्गचा ३०० वर्षाचा इतिहास उलगडते.यात अगदी पिटर्स्बर्गमधील जुन्या इमारती,प्लॅन्स,जुनी उपकरण्,शहराची जुनी चित्रे इत्यादी अनेक गोष्टी आहेत.
पिटर आणि पॉलच्या किल्ल्यातुन १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीमधे विंटर पॅलेसवर तोफांनी हल्ला करण्यात आला होता.

शेवटी आम्ही नौकेतुन शहराची शेवटची सफर करुन धावत पळत रेल्वे पकडली.रेल्वे सुटायच्या अगदी दोन्-तीन मिनिट आधी आम्ही तेथे पोहोचलो होतो.सेंट पिटर्सबर्गमधील अनेक महत्वाची ठिकाणे आम्ही पाहु शकलो नाही.५ दिवस पिटर्सबर्ग बघायला कमी पडतात.१५ ते ३० दिवस असतील तर पिटर्सबर्ग व्यवस्थितपणे बघता येथे.पण आमची ही पिटर्सबर्गची यात्रा खुपच सुंदर झाली.

Thursday, April 16, 2009

रशियातली शिवजयंती

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आलया
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

यावर्षीही तिथीप्रमाणे शिवजयंती सारातोव्ह्,रशियातील आमच्या होस्टेलमधे करण्याची ५ वर्षांची प्रथा आम्ही चालु ठेवली.१३मार्च२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात शिवरायांची आरती,त्यांचा संक्षिप्त जीवनक्रम,काही कविता,फत्तेखानाची पुरंदरवरची फजिती आणि शाहिस्तेखानावर हल्ला ही कथाकथने,एक भाषण्,'राजा शिवछत्रपती'चे 'इंद्रजीमी जंबपर' व 'हिंदवी राज्य हे आले' ही गाणी झाली. त्याचबरोबर सावळ्या तांडेलांची शिस्त आणि कान्होजी जेध्यांची निष्ठा यावर दोन छोटीसे नाट्यप्रसंग झाले.

माझे भाषण येथे पाहु शकता(हे अर्धेच भाषण आहे.मुख्य मुद्दे शुट झालेले नाहीत)
भाग १ -


भाग२-


गीत-हिंदवी राज्य हे आले रे आले
गायक्-विक्रांत ओव्हळ,लेखक्-शरद मोहरकर
मुळ गीत्-आनंदाच्या गावाला


फोटो येथे बघु शकता-
http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivjayanti2009#









Friday, January 23, 2009

नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा."
नेताजी सुभाषचंद्र बोस
काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती . नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की 'भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले?' या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच अशी त्यांच्याबद्दलची माहीती मिळवल्यावर माझी खात्री झालेली आहे.पण या इतक्या महान देशभक्ताला आमच्या देशाने कृतघ्नपणे अशी वागणुक दिली की त्याला आपल्या आयुष्यातली शेवटची दशके स्वतःची ओळख लपवत काढावी लागली.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!'पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली.गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला.काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही.गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला.त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात्.आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले की "मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल.मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही.मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत. "

नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती.त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता.
.
सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही येथे उल्लेख करावासा वाटतो.सध्या नेताजीम्चे अनेक समर्थक डावे असल्याने ते याच्याकडे दुर्लक्ष करतात.पण हा मुद्दा इतिहासाच्या पानांत महत्वाचा आहे.बोस्-सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्‍यांचे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात.त्यापेक्षा दुसर्‍या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले.यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या.

नेताजी सुटुन काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना 'Free India Radio' आणि 'Free India Cente'' सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने 'जय हिंद' हा नारा दिला तसेच 'जन गण मन' हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी' किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की "तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल". जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३फेब्र.१९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.
जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते.नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली.जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.नेताजी म्हणाले की ''आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्‍या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-'चलो दिल्ली ,चलो दिल्ली'.मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्."नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की "तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?".त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते.आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्‍या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत 'माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.'

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तथाकथित अपघाती मृत्युचे गुढ भारतात अनेक वर्ष होते.पण मुखर्जी कमिशनने दिलेल्या रीपोर्टनंतर हे स्पष्ट झाले आहे की त्यावेळी सुभाषबाबुंचा मृत्यु झाला नव्हता.तैवानने अशा प्रकारचा विमान अपघात झालाच नाही हे स्पष्ट केलेय्.असे म्हटले जाते की नेताजी त्यानंतर रशियात गेले होते.तेथे सायबेरीयात त्यांना ठेवले गेले होते.स्टॅलिनच्या मुलीने दिल्लीत पत्रकारांना हे स्पष्ट केले होते.सर्वपल्ली राधाकृष्णनही नेताजींना तेथे भेटले होते असे म्हणतात.त्यानंतर नेताजी चिनमधे गेले होते.त्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी संन्यास घेतला.१९५६ मध्ये भारत सरकारने हे मान्य केले की जर नेताजी भारतात आले तर त्यांना 'वॉर क्रिमिनल' म्हणुन ब्रिटनला सोपवले जाईल्.त्यानंतर १० वर्षांनी इंदिरा गांधींनीही तेच सांगितले.या सर्व काळामध्ये अनेक नेताजींच्या सहकार्‍यांनी त्यांना बघितले होते.काही जर्मन अधिकार्‍यांनीही त्यांना बघितले होते.त्यानंतर सुभाषबाबु भारतात आले आणि बरेच लोक असे म्हणतात की ते 'भगवानजी' अथवा 'परदा बाबा' या नावानी रहात असत.आनंदमयी मा,अतुल सेन,लीला रॉय,प्रतिभा मोहन रॉय वगैरेंना भगवानजी भेटले.यापैकी बरेच नेताजींना पुर्वीपासुन ओळखत होते.त्याचबरोबर इतरही अनेक नेताजींच्या साथीदारांनी भगवानजी हेच नेताजी आहेत असे सांगितले.पण नंतर भगवानजींनी अनेकांशी भेट नाकारली.नेहरुंच्या मृत्युच्या वेळीही भगवानजी त्यांना श्रध्दांजली वहायला गेले होते व काही वर्तमानपत्रात तसे फोटोही आले होते.गोळवलकर गुरुजींनीही त्यांच्याशी त्यानंतर पत्रव्यवहार केला होता.जनता पार्टीचे खासदार समर गुहा यांनी शपथेनी सांगितले की नेताजी जिवंत आहेत.आणि त्यांनी अनेकांना तसे फोटोही पाठवले.भगवानजी गुहांवर चिडले आणि परत कधीही त्यांना भेटले नाहीत्.मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला हे अमान्य केले.नंतर त्यांनीही 'नेताजी जिवंत आहेत व त्यांनी संन्यास घेतला आहे' असे सांगितले.भगवानजींनी ४ वेळा आपण नेताजी आहोत हे मान्य केले होते.भगवानजींच्या सामानामध्ये नेताजींची जर्मन दुर्बिण व खोसला कमिशनचे सुरेश बोस यांना दिलेले ओरीजिनल समन्सही सापडले.भगवानजी आणि नेताजी दिसायला सारखेच होते असे अनेकांचे मत होते.हस्ताक्षरतज्ञ बी.लाल कपुर यांनी नेताजींचे आणि भगवानजींचे हस्ताक्षर सारखेच आहे असे सांगितले होते त्याचबरोबर नेताजींची पुतणी ललिता बोस यांनीही भगवानजींचे हस्ताक्षर हेच नेताजींचे हस्ताक्षर आहे असे सांगितले.मुखर्जी कमिशन जरी नेताजी विमान अपघातात मारले गेले नाहीत व रेणकोजी मंदिरातील अस्थि त्यांच्या नाहीत असे सांगते तरी पुराव्यांअभावी 'भगवानजी हेच नेताजी आहेत' हे मान्य करत नाही.पण 'हिंदुस्तान टाईम्स्'ने घेतलेल्या शोधानंतर व अनेक नेताजींच्या सहकार्‍यांच्या म्हणन्याप्रमाणे नेताजी हेच भगवानजी होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे असे मी वर म्हटलेय त्याचे स्पष्टीकरण देतो. नेताजींची इंफाळ मोहिम फसली पण तरीही आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जेंव्हा भारतात वॉर क्रिमिनल्स म्हणुन आणले गेले तेंव्हा त्यांना जनतेनी प्रचंड पाठींबा दिला.आझाद हिंद सेनेच्या फौजांच्या कर्तुत्वाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली.Commander-in-Chief असलेल्या Claude Auchinleck ने म्हटले की 'भारतीय सैनिकांमध्ये आझाद हिंद सेनेबद्दल आदराची भावना आहे.'त्यानंतर रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या ५२०० सैनिकांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना होणार्‍या शिक्षांच्या निषेधार्थ बंद पुकारला.आणि त्यानंतर हीच बंदाची भुमिका भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये पसरली.त्याचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुर्ण भारतीय नेव्हीने उठाव केला व युनियन जॅक बर्‍याच जहाजांवरुन उतरवला.त्याचबरोबर मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला.या व इतर सर्व घटनांकडे ब्रिटीशांचे लक्ष होते. नवनिर्वाचित ब्रिटीश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी ब्रिटनच्या संसदेत हे स्पष्ट केले की 'ब्रिटीश भारतीय सैन्य आता काही ब्रिटीश सत्तेच्या ऐकण्यात राहीलेले नाही.त्यामुळे कधीही हे संपुर्ण सैन्य ब्रिटीशांच्या विरुध्द जाउ शकते.व दुसरीकडुन भारतात सैन्य पाठवणे शक्य नाही.त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग आहे.'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांच्या 'हिस्टरी ऑफ बेंगाल' पुस्तकाला कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधिशांनी एक पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी सांगितले की जेंव्हा ते राज्यपाल होते तेंव्हा पंतप्रधान ऍटलींशी त्यांची कलकत्त्यात भेट झाली.त्यावेळी चक्रवर्तींनी 'गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताच्या स्वातंत्र्य देण्यात किती वाटा आहे' असे ऍटलींना विचारल्यावर ऍटलींनी उत्तर दिले 'मि-नि-म-ल'.यावरुन हे स्पष्ट होते की आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच लागेल व त्यांना अशा प्रकारचे सैन्य उभे करणास प्रोत्साहित करणार्‍या स्वा.सावरकरांचे अप्रत्यक्ष योगदान देण्याचे श्रेयही द्यावेच लागेल. कुशल वक्तृत्व्,त्यातुन सैन्याला आपले सर्वस्व देउन धाडस करण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्य नेताजींमध्ये होते.लेखाचा शेवट नेताजींच्या सिंगापुरमधील एका भाषणाच्या ओळींनी करतो.त्यांचा धिरगंभीर आवाज्,त्यातील हृदयाला भिडणारी भाषा यामुळे आजची परीस्थिती पुर्णपणे वेगळी असुनही अंगावर काटा उभा रहातो. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना हैहमै कुर्बानी खाना है सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकरकोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!!
चिन्मय कुलकर्णी

Wednesday, January 7, 2009

गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

"There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी
केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.


आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.

गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्‍यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?

परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.

गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.

निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्‍याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.
चिन्मय कुलकर्णी