Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, November 4, 2008

जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना.

खालील लेख हितगुज ऑनलाईन दिवाळी अंक २००८ मधे प्रसिध्द झालेला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू
उभयांनी दोष उभयांचे खोडावे
द्वेषासी दुष्ट रुढींसी सोडावें
सख्यासी आईच्यासाठी जोडावें
स्वातंत्र्यवीर सावरकर

वरील ओळींमधून सावरकर 'समस्त हिंदू एकमेकांचे बंधू आहेत' हे सांगतात पण हिंदू समाजास लागलेला सर्वात मोठा शाप म्हणजे 'जात' आहे. जर समस्त हिंदू बंधूंची एकजूट करायची असेल तर ही 'जात' संपवणे आवश्यक आहे. आणि हिंदूंची एकजूट करणे हेच हिंदुत्वाचे लक्ष्य आहे. मग हिंदुत्वाचा एल्गार करणार्‍या सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या हिंदुत्ववाद्यांनी याबद्दल काय भूमिका घेतली व काय कार्य केले याचा थोडासा विचार करु.

स्वातंत्र्यवीर सावरकर
'हिंदुत्व' हा शब्दच ज्यांनी दिला आणि आधुनिक हिंदुत्व ज्यांनी एका अर्थाने सुरु केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. ज्या काळात देशात अस्पृश्यता होती, देशावर अनेक अंधश्रध्दा, कालबाह्य रुढी-परंपरांचा प्रभाव होता तेव्हा सावरकरांसारख्या अस्सल बुद्धिवाद्याने, विज्ञानवाद्याने आणि हिंदुत्ववाद्याने त्यावर अखंड प्रहार केले. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल म्हणून त्यांनी ते विचार मांडणे सोडले नाही. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले. या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी यांना भटास बोलावू नका असे सांगितले. त्याचबरोबर काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्याची खिल्ली उडवली. पण अजूनही अशी 'महासंमेलने' आपल्याकडे आयोजित होत आहेत आणि ती करण्यात अनेकांना 'गर्व' आहे यावरून सावरकरांना अपेक्षित असलेला समाज किती दूर आहे हे लक्षात येते. जाती मोडण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे यावे हे ही त्यांनी सांगितले.


सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजिल भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्‍या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. 'सावरकरांनी मनु:स्मृती जाळली नसली तरी तिचे विचार मात्र जाळले असेच म्हणावे लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'Annihilate the Caste' हीच शिकवण सावरकरांनी दिली. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला त्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात यावी असे सावरकर म्हणत. त्यानंतरच्या दहा वर्षात अस्पृश्यता संपवली नाही तर अजून शंभर वर्ष त्याला लागतील असेही सावरकरांनी सांगितले जे बर्‍याच प्रमाणात खरे आहे असे दिसून येते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या २०० वर्षात झाले नाही तितके काम येत्या २ वर्षात करायचे असा आदेश दिला होता. सावरकर प्रखर विज्ञानवादी होते. शुद्धीच्या वेळी गंगामाईचे पाणीही शिंपडायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था पाळण्यात दोष सर्वांचा असला तरी गेल्या ८-१० दशकात तरी अस्पृश्यतेसारखी राष्ट्रविघातक रुढी पाळून चातुर्वर्णिक स्पृश्यांनी एक राष्ट्रघातक पाप केले आहे असे ते म्हणतात. सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ते सनातनास अपरिवर्तनीय सत्य न मानता सत्यास अपरिवर्तनीय - सनातन मानत. जात्युच्छेदनासाठी त्यांची शिकवण फार महत्वाची आहे. पण हिंदुत्ववाद्यांकडून त्यांच्या विचारांकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. नवतरुण वर्ग सावरकरांच्या विचारांनी प्रभावित नक्की होऊ शकेल. गरज आहे फक्त एका सक्षम नेतृत्वाची. हिंदुत्ववाद्यांमधे जात्युच्छेदनाच्या कामातील मानबिंदू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शेवटच्या कालखंडात सावरकरांनी सांगितले होते की 'माझी मार्सेलिसची उडी विसरली तरी चालेल पण माझे रत्नागिरीतील कार्य विसरु नका'. हिंदुत्वासाठी, राष्ट्रवादासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकीसाठी जात्युच्छेदन सर्वात महत्वाचे आहे हे सावरकरांनी बरोबर ओळखले होते. आजकाल आपले समर्थक दूर जातील म्हणून फक्त विरोधकांवरच हल्ला करणारे लोक आहेत. त्यामुळेच ते यशस्वी 'राजकीय' नेते आहेत तर सावरकर 'विचारवंत, प्रबोधक व समाजसुधारक' ठरतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमीच मनुवादी म्हणून टीका केली जाते. त्यांचे याबाबतचे धोरण मलातरी क्लिष्ट वाटते. बरेच स्वयंसेवकही याबाबत गोंधळलेले वाटतात. याबाबत गोळवलकर गुरुजींचा विचार करावा लागेल. श्रीगुरुजींच्या 'विचारधन' मध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. त्यात ते सांगतात की जातीव्यवस्था आपल्या विकासाच्या आड आली आहे याला काही पुरावा नाही उलट जातीव्यवस्थेमुळे आपली एकता टिकवण्यासाठी मदतच झाली आहे.त्याचबरोबर ब्राह्मण म्हणजे मुख, क्षत्रीय म्हणजे हात, वैश्य म्हणजे मांड्या आणि शुद्र म्हणजे पाय वगैरेही ते विचारधन मध्ये सांगतात. पण अस्पृश्यतेच्या विरुध्द भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे.'अस्पृश्यता सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे नाव आहे' असे ते म्हणत.त्याचबरोबर १९६९ साली उडुपी येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सभेत 'न हिंदू पतितो भवेत! हिंदव: सहोदरा सर्वे!!' म्हणजे कोणीही हिंदू दलित नाही, पतित नाही, अस्पृश्य नाही. तर बंधू आहे. असा प्रस्ताव पारित करण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय यांनीही आपल्या १९६५ सालच्या भाषणात विराट पुरुषाच्या विविध अवयवांची थिअरी दिली आहे पण त्याचबरोबर पुढे म्हटले आहे की 'पण आम्ही जातींमधील भांडणांचे विरोधक आहोत', म्हणजे थोडक्यात संघाच्या या जेष्ठ नेत्यांना जातीव्यवस्था मान्य होती पण जातीभेद मान्य नव्हता, जातीजातीतील भांडणे मान्य नव्हती. पण जातच नको असे स्पष्ट ते सांगत नाहीत. कोणे एके काळी जातीव्यवस्था जन्मावरून ठरत नसे, जातीव्यवस्थेमुळे समाज एकसंध रहाण्यास पूर्वी मदत झाली वगैरे संघाचे लोक सांगत असतात. अरे पण कोणे एके काळी माणूस उघडा नागडाच रहात असे आणि कच्चे मांस खात असे. पण त्याचा आजशी काही संबंध आहे का? विराट पुरुषाचे विविध अवयव हे एकीसाठी पूरक एकेकाळी नक्कीच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरही १९३६ साली लिहिलेल्या एका लेखात हे मान्य करतात. त्यात ते लिहितात "शरिराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्याने ते एका शरिराचा भाग नाही असे होऊ शकत नाहीत. तद्वतच, क्षत्रिय बाहूपासून, ब्राह्मण मुखापासून, वैश्य मांड्यांपासून, शूद्र पायांपासून उत्पन्न झाले असले तरी ते एका शरिराचा भाग आहेत हे दाखवणे हा पुरुषसूक्ताचा उद्देश आहे असे आम्हाला वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. श्रमविभागाने झालेला भेद निरर्थक आहे ही शिकवण लोकांना देऊन ऐक्याचा ठसा लोकांच्या मनावर उठवावा या हेतूने पुरुषसूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे."पण ब्राह्मणांनी याचा नेमका उलटा अर्थ लावला असेही बाबासाहेब पुढे लिहितात.

त्यामुळे जुन्या काळी वर्णव्यवस्था उपयुक्त ठरलीही असेल पण सध्या ती कालबाह्यच नव्हे तर राष्ट्रघातक झाली आहे हे सांगायला संघाचे नेते टाळतात असे वाटते. शिवाय संघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला अभिजन वर्ग दुखावला जाऊ नये म्हणून संघ सवर्णांचा व मुख्यत्वे ब्राह्मणांचा यात दोष आहे हे ही सांगायला कचरतो असे वाटते. पण याचबरोबर इतरही नेत्यांची वक्तव्ये लक्षात घ्यायला हवीत. बाळासाहेब देवरस यांनी ‘If untouchability is not wrong, nothing in the world is wrong’ असे सुस्पष्ट विधानही केले आहे. त्याचबरोबर २ वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांना बोलावून त्यात सरसंघचालक के.सुदर्शन म्हणाले, 'आम्ही आमच्या शाखेमध्ये कधीच जातीयवाद पाळत नाही. दलित हे आमच्याच रक्ताचे आहेत पण काही कारणांनी चुकीच्या आचरणाने अस्पृश्यता अशा लोकांवर लादली गेली, जे आमच्याच धर्माचे भाग आहेत' पण ज्या जोराने संघ राममंदिर, रामसेतू वगैरे मुद्दे मांडतो त्या जोराने तो जात्युच्छेदनाविरोधी भूमिका नक्कीच घेत नाही. त्याचबरोबर संघाच्या विविध कार्यक्रमांना शंकराचार्यांचे घोळके असतात ज्यामुळे हे काय जात्युच्छेदन करणार अशी शंका साहजिकच येते. संघ दलितांचे उपनयन अथवा दलितांना पुजारी बनवणे वगैरे काम करते पण आंतरजातीय विवाह लावणे संघाला सहज शक्य आहे पण संघ ते कार्य करत नाही (मलातरी माहीत नाही). याबद्दल परिवाराच्या एका वेबसाईटवर या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे की आमचा आंतरजातीय विवाहास विरोध नाही पण जर ते लावले तर मागच्या पिढीतील लोक रागावतील व हिंदुत्वापासुन दूर जातील. पण जात्युच्छेदन करायचे असल्यास कोणी ना कोणीतरी दुखावला जाणारच आहे. दुखावले जाणार्‍याची काळजी संघाने करण्याची गरज नाही कारण संघ ही राजकीय पार्टी नाही. प्रबोधन करायचे असल्यास विरोध हा स्वाभाविक आहे. संघ अनेकदा प्रतिगामी भूमिका घेतो असेही दिसते. म्हणजे संघाच्या एका नेत्याने मुलाखतकार मुलीने जीन्स घातली म्हणून दाखवलेली नाराजी अथवा प्रमोद महाजन फाईव्ह स्टार कल्चर आणायचा प्रयत्न करत आहेत म्हणून धुसफूस इत्यादी अनेक छोट्यामोठ्या गोष्टींनी संघ मध्ययुगीन कालखंडात घेऊन जाईल अशी भीती अनेकांना वाटते. याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. सध्या संघ ही एकमेव हिंदुत्ववादी संघटना आहे जी देशभर पसरलेली आहे व जिच्याकडे हजारो स्वयंसेवक आहेत व जात्युच्छेदनाचे कार्य तेच व्यवस्थितपणे करु शकतात.

शिवसेना
कडव्या व जहाल हिंदुत्वाचा पुकार करणार्‍या शिवसेनेचा विचार याबाबत करणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी शिवसेना ही एक संघटनाच नाही तर एक राजकीय पार्टी आहे यामुळे त्यांच्या याविषयीच्या कार्यात अनेक मर्यादा आहेत. राजकीय पक्ष कुठलीही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत ज्यामुळे मतदार दुखावतील. त्यामुळे समाजप्रबोधनास अनेक मर्यादा राजकीय पक्षाला येतात. शिवसेना ही हिंदुत्वाच्या क्षेत्रात उतरलेली शेवटची संघटना आहे. पण जात्युच्छेदनाचे कार्य इतर हिंदुत्ववाद्यांनी सुरुही केले नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ते मोठ्या प्रमाणात सुरू केले होते. जुन्या काळातील जातीपाती, अनिष्ट रुढी, परंपरा यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. शिवसेनाप्रमुखांकडे त्यामुळे हे गुण येणे स्वाभाविक होते. सेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली तेव्हाच आपले ब्रह्मवाक्य दिले होते की ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सर्व वाद गाडा आणि सर्वांची एकजूट करा. या भूमिकेवर चालण्यास ते बर्‍याच अंशी यशस्वी ठरलेले आहेत. शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे जातीपातीची छुपी राजकारणे, पायखेची होत नाही. जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक मागासपणावर आरक्षण द्यावे ही मागणीही त्यांनी अनेक वर्षं लावून धरली आहे. त्याचबरोबर सेनाप्रमुखांनी गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती आहेत. या दोन सोडल्या तर तिसरी जात नाही अशी जातीव्यवस्थेविरुध्द स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देऊनही त्यांच्यावर 'मनुवादी' असा ठपका बसलेला नाही.


हिंदुत्वाचा झेंडा घेउन जेव्हा शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरले तेंव्हा 'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मला करायचे नाही' हे त्यांनी ठासून सांगितले. त्याप्रमाणे वागणूकही ठेवल्याने ओबीसींनी शिवसेनेला भरपूर पाठिंबा दिला. हिंदू धर्माच्या पालनाच्या बाबतीत त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेले आहे असे दिसते. तुमच्या मनाला पटेल त्या पध्दती अवलंबा, पण त्या व्यक्तिगत स्तरावर. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे प्रतिकार व जहाल पद्धतीचे आहे. सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन, त्यांची जातपात गाडून एक बलाढ्य राष्ट्रवादी शक्ती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता जी शक्ती राष्ट्रद्रोह्यांवर वरवंटा फिरवेल. त्याबद्दल बाळासाहेब म्हणतात की 'या हिंदुस्तानावर आणि हिंदूंवर जो कोणी वाकडी नजर टाकेल त्याला झोडणारं माझ हिंदुत्व आहे. मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर धर्मांध, देशद्रोही मुस्लिमांना बडवणारा हिंदू हवा आहे.'सावरकर आपल्या 'हिंदुत्व' पुस्तकात हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहे हे स्पष्ट सांगतात. बाळासाहेबांचे हिंदू धर्मातील विविध धारांपासून दूर असणारे हिंदुत्व सावरकरांना अपेक्षित असलेल्या हिंदुत्वाशी साधर्म्य दाखवणारे आहे. वरती सावरकरांनी शुध्दीच्या वेळी गंगेचे पाणीही शिंपडू नका असे सांगितल्याबद्दल दिले आहे तशाच प्रकारे शिवसेनाप्रमुखांबद्दलची एक घटना देतो. बाळासाहेब कांबळे यांना ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता. ते शिवसेनाप्रमुखांकडे आले आणि त्यांनी तसे सांगितले. तिथे इतरही हिंदुत्ववादी मंडळी होती त्यांनी सांगितले की आता व्रतवैकल्ये करा, होमहवन, यज्ञयाग वगैरे करा,जेवणावळी वगैरे वाढा. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उद्गारले "कसल्या जेवणावळी वाढताय?? त्याला गंध लावा आणि 'जय हिंद' म्हणायला सांगा की झाला तो हिंदू." म्हणजे यज्ञयाग, व्रतवैकल्ये चुकीची आहेत असे नाही. पण त्यात हिंदुत्व अडकवू नका. अर्थातच आपले समर्थक मतदार दुखावतील म्हणुन अनेकदा प्रखर भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही. त्यामुळे शिवसेनेवर तशी मर्यादा आहे. शिवसेनेने या विषयावर मोठी आंदोलने वगैरे केलेली नाहीत पण त्यांच्या पक्षाचे नियमन व आचरण नक्कीच राजकीय पक्षास स्वागतार्ह आहे. जात्युच्छेदनासाठी संघाने सेनेपेक्षा जास्त काम केलेले असेलही पण संघ ही एक संघटना आहे व सेना ही एक राजकीय पार्टी आहे हे विसरुन चालणार नाही. शिवसेनेने जात्युच्छेदनाचा विचार नक्कीच दिलेला आहे पण समाजाचे प्रबोधन केले आहे म्हणणे नक्कीच धाडसी ठरेल.

सध्याची परिस्थिती व भविष्य
सध्या जातीपातींमधील संघर्ष वाढीला लागला आहे. देशात लोक आपली ओळख म्हणजे जातच सांगतात. जातनिर्मूलनाचे कार्य न झाल्याने जातींचे समूहच बनले आहेत. आमचे 'सोशल इंजिनीअरींग'ही जातीच्याच नावाने होते. विविध जाती स्वतःची 'महासंमेलने' भरवून काय साधत आहेत कोण जाणे? राजकारणातही व्यक्तीची जात बर्‍याच गोष्टी ठरवून जाते. आजही अस्पृश्यता पूर्णपणे संपलेली नाही व खैरलांजीसारखी मानवतेला काळिमा फासणारी प्रकरणे घडत आहेत. विविध जातीच्या नेत्यांनी स्वतःच्या समाजाचे भले करण्यापेक्षा स्वतःचेच 'भले' करुन घेतले आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मूलनासाठी सर्व आयुष्य झटणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळही आजकाल जातीपुरती सीमित झाली आहे. सवर्णांमधे 'आम्ही कुठल्याही आरक्षणाशिवाय यशस्वी झालो' असे म्हणत श्रेष्ठभाव निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर अभिजन म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असा नवजातीवादही येऊ लागला आहे. त्यामुळे जात्युच्छेदनाची आज नितांत गरज आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याची, विचारवंताची, समाजसुधारकाची आवश्यकता आहे. चर्चिलने एकदा म्हटले होते की 'India is not a nation. It's a collection of tribes.' हे वक्तव्य धादांत चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण जात्युच्छेदनाचे काम जर जोरात झाले नाही तर चर्चिलचे वक्तव्य खरे ठरण्याची भीती नक्कीच आहे. आपल्या देशाचे हित यातच आहे की आपण आपली जातपात विसरून एकत्र आले पाहिजे. हिंदुत्ववाद्यांनी यासाठी कार्य करणे जरुरीचे आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षवादी हे कार्य बिलकुल करणार नाहीत. कारण हिंदू समाज एकत्र व्हावा असे त्यांना वाटतच नाही. तर हिंदूंच्या एकजुटीच्या ते विरुद्ध आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादाला चांगले दिवस यायचे असल्यास जात्युच्छेदनाला अग्रक्रम हिंदुत्ववाद्यांनी द्यायला हवा. जात्युच्छेदनाशिवाय हिंदूंची एकजूट ही कल्पना वेडगळपणाची आहे.

चिन्मय कुलकर्णी

संदर्भ-
'सावरकर-एक अभिनव दर्शन', savarkar.org, golwalkarguruji.org, sanghpariwar.org

34 comments:

Anonymous said...

चिन्या लेख आवडला. मुख्य म्हणजे तू संघाच्या भूमीकेबाबत बायस न ठेवता मत नोंदविल्याबद्दल तुझे अभिनंदन. सावरकरांसारखे दोन पाच नेते आपल्याला लाभले असते तर आजचा भारत बराच वेगळा दिसला असता. शिवसेना आणि आता मनसे ह्यात ऐक समान धागा आहे तो म्हणजे सर्वजातीसमभाव. कोणी कितीही त्यांचा विरुध्द असला तरी ह्या बद्दल नक्कीच त्यांना क्रेडीट द्यायला हवे.

kedar joshi

Anonymous said...

चिन्मय, अतिशय उत्कृष्ट लेख.. पुनश्च एकदा अभिनंदन.. जात्युच्छेदन हा माझा स्वतःचा अत्यंत जवळचा विषय असल्याने मला अधिकच भावले..

tanyabedekar

Anonymous said...

चिन्मय,
तुझा दिवाळी अंकातील लेख वाचला. आवडला मला....
जसं तू सावरकरांच्या कार्याबद्दल लिहिलंस तसंच जरा आंबेडकरांच्या कार्याबद्दलसुद्धा थोडंफार लिहिलं पाहिजे होतंस असं वाटलं

Anonymous said...

Dear Shri Chinmay Kulkarni,
Compliments on your excellent aticle. Please keep up the good work. You have our support.

Regards,
savarkar.org team

Anonymous said...

चन जमलाय लेख ... shubheccha

Dr Abhiram Dixit

Anonymous said...

ब्लॉग कुमार

तू एक काम कर - तुझी जी काही जात/धर्मं असेल ती सोड अणि भणंग/भिकारी अणि क्षुद्र लोकंसमवेत आपले जीवन व्यतीत कर..

तुझे उदहारण पाहून इतर लोक असेच पाउल उचलतिल..

बोलबच्चन पाना करने सोप्पा आहे, ते फक्त राजकारणी नेत्यांना शोभून दिसते..

आपल्यात धमक असेल तर आपण स्वतः ते करावे, उपदेश करने बास झाले.

- गुंडोंपंतांचा गंपू

Dr.Chinmay Kulkarni said...

गुंडोपंतांचा गंपु,
जे फक्त भिकार्‍यांबरोबर जाउन रहातात तेच जात्युच्छेदन करु शकतात अथवा जात्युच्छेदनाबद्दल बोलायचा त्यांनाच फक्त अधिकार आहे असे जे मत आहे त्यावरुनच इतक्या दशकांनंतर जातीनिर्मुलन का झाले नाही हे स्पष्ट होते.फक्त भिकार्‍यांबरोबर राहु शकणार्‍यांनाच या जात्युच्छेदनाची गरज नाहीये.भिकार्‍यापासुन अब्जाधिशापर्यंत सर्वांनाच हे करणे गरजेचे आहे.

Anonymous said...

आता जाति व्यवस्था कधिच संपणार नाहि पण ति अजुन मजबुत झालि आहे..बि.सी/ओ,बी.सी..यांच्यात समाविश्ठ असलेल्या जातिंना जे आरक्षणाचे फायदे जर हवे असतिल तर त्यांना जात मान्य करुन जात दाखला घ्यावा लागतो...आता मराठे पण जाति आधारीत आरक्षणाच्या लढाईत उतरले आहेत..व एकंदरीत पहाता सरकारला हि मागणी मान्य करावी लागेल अ्शी चिन्हे दिसत आहेत...जर हि मागणी मान्य झाली तर ८७% समाज जाति आधारीत आरक्षणाचा फायदा घेतील...त्या मुळे पुरोगामी /पुढारलेले हे फक्त शब्द प्रयोग रहातिल. असे मजेदार चित्र तयार होत आहे...त्या मुळे आता आरक्षीत व आरक्षणविरहित असे दोनच वर्ग /जाति रहातिल...त्यामुळे एकिकडे ८७ % समाज हा जाति आधारीत आरक्षणाचे फायदे घेत सरकार चालवणार..ते जाति भेद कसा नाहिसा करतिल हे पण बघण्या जोगे आहे...त्या मुळे ...जर शिक्षण/ नोकरी/राजकारण सारेच जर जात आधारेत असेल तर जात्युच्छेदन कसे होणार याचा अंदाज येणे कठिण आहे..

Avinash

Anonymous said...

mast lekh lihila aahes re

sanghachya bhumikebaddal je lihiles te ekdam barobar aahe

Saurabh

Anonymous said...

shivsenetarphe nivadnukicha umedvari detanna balasahebanni mantripadachya umedvarala kadhich jat vicharli nahi

ajinkya

Anonymous said...

Very good writeup Chinmayji.

Some retrospection is needed by everyone.

There are a few points about Sangh

The RSS has recently expressed concern over caste-based political and social conflicts, they have urged Hindus to "get rid of this evil at the earliest". Their resolution adopted at a national executive meeting said:

"Hindu society should take all necessary measures to ensure entry and access to every Hindu, irrespective of his caste, to their homes, temples, religious places, public wells, ponds, and other public places. Hindu society will have to get rid of this evil at the earliest."

The organisation further contends that "caste-based untouchability" and "feelings of high caste and low caste" were the main evils haunting the Hindu society and aims to eradicate Casteism from Indian society. To that end, the RSS has tried to reach out to prominent Dalit (traditionally the "Untouchable" Caste) leaders in India, such as poet and leader of the Dalit activist group "Dalit Panthers" Namdeo Dhasal. The Dalit Panthers have been traditional adversaries of the R.S.S and peceived them as an "upper-caste" dominated party. However, negotiations with RSS chief K.Sudarshan on August 2006 led to reconciliations, when Sudarshan declared that the RSS categorically rejects all forms of caste discrimination in the organization. He further said:

The Dalits are our own flesh and blood, but because of some ill practices and social evils the practice of untouchability has brought havoc on those who were an integral part and defenders of Dharma. This has to be corrected through our deeds and actions."

Namadeo Dhasal said at the meeting with the RSS, "Yes, I do feel that the fight to eradicate caste has to be fought by Dalits and caste Hindus together carrying forward the tradition of Adi Sankara, which got broken somewhere in between."

Sudarshan then said, "I fully agree with what you have said here today".



thatsmalayalam.oneindia.in/news/2005/10/22/india-rss-meet.html

There are many things which RSS leadership say openly. Unfortunately, the biased Indian Media does not cover its news.

aditya

Shailendra said...

खुपच छान लेख चिन्मयजी..आजवर वाचलेले हिंदुत्वाचे सर्वोत्कृष्ट अनालिसिस .

psiddharam.blogspot.com said...

चिन्मय g,
सावरकरांच्या विचारांवर आधारित अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद्. हिंदूंचे ऐक्य गरजेचे आहे आणि यात जातिभेद हा प्रमुख अड़थला आहे. जतिभेदाचे उच्चाटन केल्याशिवाय हिन्दू ऐक्य कठिन आहे. एकुणच लेखाची maandani चांगली झालीय. शिव सेनेच्या कार्याचा या दृष्टीने घेतलेला आधावाही सुन्दर झाला आहे.
मी काही संघ स्वयमसेवक नाही. परन्तु गेल्या ८ वर्षांपासून मी संघ कार्याचा अभ्यास करीत आहे. २ वर्षांपूर्वी सोलापुर दै. तरुण भारतने गोलवलकर गुरूजी यांच्यावर एक ३०० पानी ग्रन्थ प्रकाशित केला आहे. यात देशभरातील सुमारे ५० विचारवंतांचे लेख आहेत. ya granthache sampadan mi kele ahe. ya nimittane gurujinchya wangmayashi adhik parichay zala.
mala watate ki sanghane asprushyata uchchatanasathi niwadalela marga chukicha nahi. sanghachi ya babatit spast bhoomika ahe. sawarakaranni sangeetalelya margane sangh he kaam karit naselhi pan mhanoon sanghachi bhoomika chukate ahe ase nahi.

Anonymous said...

जात हा फक्त हिंदु समाजालाच लागलेला शाप नाही. मुसलमानांमध्ये सुन्नी,शिया हे दोन वेगळे आहेत व त्यांच्यातही पठाण, अन्सारी, पटेल, बोहरी ई. ई. पोटजाती आहेत. क्रिश्चनांमध्ये कॅथोलिक, प्रोटेस्टंट ह्या दोन प्रमुख विभागण्या असुन त्यांच्यातही पोटजाती आहेत. आणि त्यांचही आपसात वाजतंच. तेव्हा जातीभेद फक्त हिंदुंचाच प्रश्न नसुन समस्त मानवजातीचा आहे.
मी तुमचा विषय ग्लोबल लेव्हलला नेला एवढंच.

rahul

Anonymous said...

कुठलाही माणुस एखाद्या राजकिय पक्षाने
किंवा नेत्याने सांगितले म्हणुन जात्युविच्छेदन ( रोटी बेटी व्यवहार) करण्यास तयार होणार नाही..
माझं पण मतं हेच आहे..
अंतर्जातीय किंवा अंतरधर्मीय विवाह नसावेत.
लेख वाचला.
काही गोष्टी वाचायला बऱ्या वाटतात पण आचरणात आणणे कठीण असते..(स्वतः)

Mahendra

Anonymous said...

chinmay, hindutvabaddal khup changale vachayala milale... chan lekh aahe... sandarbhashi dilyabaddal abhari aahe chinmay.

Amit

Anonymous said...

जात्युच्छेदनावरचा चिन्याचा लेख विशेष आवडला.

gs1

Anonymous said...

Good article! Good analysis. Each entity mentioned were important for Hindutva. They had their own short comings, they still have their short coming. 'Hindu and Muslim are like different nations' is one of the most important thought put forward in 20th century, it is sad but it is fact I like SAvarkar for that but Savarkar didn't have patience to create a mass movement like Tilak, Ambedkar or Gandhi. RSS is a very much needed organisation, they are like Gurakha protecting the Hindu house.Sometimes they try to define Hindu relegion which they should not do because many of their leaders have very biased understanding of what Hindusim is. The Bauddhik held at the RSS shakhas is one of the most nonintellectual conversation I have heard in my life. Most of the time it is Abaudhik :-) but Hindu society needs them. The last and and the most loud; our own Marathi Shivsena. Well they did talk on Hindusim but its more or less Marathi Hindu organization. But u r right that they are very unbaised towards caste and in good times they are unbiased towards others languages also but in testing times they are like a storm, they just loose their brains.

Anonymous said...

Mahendra ne mandalela mat mala agadi manya ahe. Hya goshti bolana barach sopa ahe pan acharanat anana faar avagad ahe.. antarjatiya luv marriage possible ahe pant yacha farasa kautuk nahi antar jatiya Arranged marraige he faar avagad ahe. Savarkar gharana pune Mumbai parisatach rahata mazya mahitit tari tyanchya kade koni antarjatiya lagna kelela nahiye. Tyanchya kade Godase gharanyatali ek mulagi soon mhanun karnyat ali i think tyachya peksha motha dhadas he ekhadya dalit mulila soon mhanun anane he ahe.

Anonymous said...

एकदम बरोबर
जातीचे उच्चाटन जालेच पाहिजे.

मोठ्या शहरात कोण कुठे जात वगैरे कुठे मानतात

पण एकजुट होण्यासाठी जातीचे उच्चाटन जालेच पाहिजे असे काही नाही

फक्त एकमेकांचे मत परिवर्तन जाले तरी जास्त अवधी लागणार नाही

फक्त एक खमका नेता पाहिजे आदरणीय शिवसेनाप्रमुख यांचा सारखा

ज्या दिवशी भगवा लाल किल्यावर फडकेल व् पूर्ण हिंदुस्थानात शिवशाही येइल तेंवाच आपण स्वत्रन्त्र जालो असे म्हणता येईल

Ashish Godase

Anonymous said...

I admire Shivsena's views which are different than others. I would like to see more of implementation despite being a political party. On the contrary, being an established party, they should be able to do something potential. Savarkar had a different time to face, when just presenting a thought was a big thing. Now, we have a democratic platform, freedom of every kind, stronger socio-economic base.

Just an example... I would have opposed the Mah Govt's decision on increasing creamy layers limit to Rs 4,50,00 per annum. This will deprive the real deserving poor OBCs. Someone needs to talk about stats more intellectually. The issue could have been used at a political advantage.

Gomaji

Unknown said...

Dr.Vrushali Shelar....
....hey chinmay hi...manapasun abhinandan...atishay surekh lekh lihla ahes....khup divsananatr kahi tari changl vachayla milal ahe....pan jati vavyavstheche vadvivad he lathya marine sutnar nahit he tu tithe mention karayla hav hotas....karan ha prashna yenarya 100varshat suten asa vatat nahi....wel it is relly vry beautiful article...congratulations

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

दिवाळि अंकातला तुमचा लेख कालच वाचला. खुपच संतुलित विश्लेषण! छान जमलाय लेख, मला आवडला.

marhatmoli

Anonymous said...

मित्रहो, विषय महत्वाचा मांडलेला आहे, हया विषयावर चर्चा हि अपेक्षित होतीच. आतापर्यंतच्या आपल्या वरील चर्चेवरुन अंतर्जातीय किंवा अंतरधर्मीय विवाह हाही एक पर्याय सुचतोय तो एक निर्मुलनाचा उपाय आहे आणी तो मान्य करन्याजोगा आहे पण तो खात्रीलायकपणे जात्युच्छेदनावरील उपाय होऊ शकत नाही.
जात्युच्छेदनावरील उपायांची जर खरोखरच माहिती करावयाचची असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत "Annihilation of Caste" अर्थात "जातींचे निर्मुलन" हे लहानस पुस्तक वाचा. हे एक भाषणाचे लिखीत स्वरुप आहे. माझ्या मते जातीं समस्येवरील सर्व उपायांची/पर्यायांची सखोल मांडणी/ऊहापोह त्यांनी या पुस्तकात केलेली आहे. हे पुस्तक वाचुन महात्मा गांधीजी म्हण्हाले कि "डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे हिंदु धर्माला एक आव्हानच आहे. -"Dr.Ambekar is challenge for Hinduism."
मी जास्त काही लिहित नाही, मला वाटते तुम्ही जर वरील पुस्तक वाचले तर तुम्हाला संदर्भासहित अधिक माहिती मिळु शकेन, आणी तुमच्या सर्व शंकाचे खात्रीलायक निरसन होईल.
धन्यवाद!!!


Sachin

Mangesh said...

एक वेळ चार बेडके एकत्र ठेवता येतील पण हिंदु संघटीत करणे अशक्य किंवा चार हिंदुंची तोंडे एका दिशेला असतात जेव्हा पाचवा आडवा असतो अशा प्रकारची अनेक वाक्ये आपल्या परिचयाची आहेत. खरेच हिंदु संघटन शक्य आहे का आणी आवश्यक आहे का? संघटनेसाठी संघटन शक्य आहे का केवळ प्रतिक्रियात्मक संघटनच शक्य आहे? आजच्या भारतातील सामाजिक, राजकीय परिस्थितीत हिंदु संघटनेचे फायद्यांपेक्षा तोटेच अधिक आहेत का? असे अनेक प्रश्न सामाजिक जाणीव असणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मनात उठणे स्वाभाविक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेले आठ दशके या एकाच ध्येयाने कार्यरत आहे. संघाचा तात्त्विक विरोधक देखील हे मान्य करेल की संघाने समाजात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली आणी त्यासाठी आयुष्य समर्पित करणार्‍या कार्यकर्त्यांची पिढयानपिढया चालु रहाणारी एक रचना निर्माण केली जी आजच्या उपभोगप्रधान समाजात देखील कार्यरत आहे. ऍतिहासिक कारणे काहीही असोत पण आपल्या समाजात सामाजिक जाणीव पुरेशी विकसित झाली नाही हे कटु सत्य आहे.

संघाने परिस्थितीचे निदान करताना काही निष्कर्ष मांडले

- हिंदुच्या परिस्थितीला कोणतेही बाह्य कारण कारणीभूत नाही. (बाह्य आक्रमण, भ्रष्ट जातीव्यवस्था, पाश्चिमात्यकरण, मार्क्सवाद, आधुनिक शिक्षण, मुक्त अर्थव्यवस्था इत्यादी)
- वर उल्लेखलेली आणी अन्य कारणे ही हिंदुंच्या सद्यपरिस्थितीची कारणे नसून ते परिणाम आहेत.
- अन्य संघटीत धर्ममताप्रमाणे हिंदुंचे संघटन शक्य नाही आणी हिंदुंचा तो स्वभावपण नाही त्यामुळे एक पुस्तक-एक धार्मिक नेता-एक पुजापद्धती हे हिंदु संघटनेचे सूत्र होउ शकत नाही.
- जातींचा केवळ उल्लेख करुन जातीव्यवस्था जाणे शक्य नाही. तसेच जातीव्यवस्थेला पर्याय निर्माण न करता ती विसर्जित करणे हे देखील योग्य नाही.
- हिंदुंची आत्मग्लानी जी प्रामुख्याने नैसर्गिक आणी काहीप्रमाणात ऐतिहासिक आहे ती प्रामुख्याने हिंदुंच्या सद्यस्थितीला कारणीभूत आहे.
- याच आत्मविस्मृतीतून धर्मांतरितांना परत सामावून घेण्यास अक्षमता.
- परिस्थितीसापेक्ष हिंदु जीवनपद्धतीची व्यावहारीक पातळीवर पुनर्स्थापना आणी त्यासाठी आधुनिक कार्यपद्धतीची रचना हीच या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी राजकारणविरहित संघटनेची बांधणी.

- |एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति| (ऋग्वेद १.१६४.४६) आणी | वसुधैव कुटुंबकम्| हे सुत्र असलेल्या हिंदु जीवनपद्धतीचे जतन जागतिक बंधुभावासाठी आणी सहजीवनासाठी आवश्यक त्यासाठी प्रथम ती हिंदुंनी आत्मसात करणे गरजेचे.

संघाच्या कार्यपद्धतीचा गाभा आणी त्याचे दूरगामी परिणाम

- संघ काही करणार नाही तर स्वयंसेवक त्यांच्या रुचीनुसार सगळे करतील. संघ केवळ सहज रचना निर्माण करेल जी पूर्वी मंदिरांच्या माध्यमातून उपल्ब्ध होती आणी समाजाला एक सुत्रात बांधून ठेवण्यास कारणीभूत ठरली होती.
- सकारात्मक गोष्टींचा उल्लेख आणी नकारात्मक गोष्टींना अनुल्लेखाने मारणे. ज्यामुळे क्रांतीचे दुष्परिणाम न होता उत्क्रांती शक्य.
- | त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् |
| ग्रामं जनपद्स्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् | महाभारत आदिपर्व ११५.३६
मोठया गोष्टींसाठी लहान गोष्टींचा त्याग करणे हा विवेक जागृत ठेवणे. प्रत्येक वेळेस लहान ओळख (उदा. जात) अनावश्यकच असते असे नाही तर त्याची मर्यादा लक्षात घेणे गरजेचे.
- लहान रेघ मोठी करण्यासाठी त्याच्याशेजारी दुसरी मोठी रेघ काढणे. जात, प्रादेशिक भावना, पंथ याच्यावर हिंदु ही मोठी रेघ. आज हिंदुत्व राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात केंद्रस्थानी.
- राजकारणविरहित संघटनेमुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचणे आणी सशक्त लोकशाहीला पूरक असा राष्ट्रवादी नागरिकांचा दबाव गट निर्माण करणे शक्य.

आज केवळ संघच नाही तर आपला संपूर्ण समाज एका संक्रमण परिस्थितीतून जात आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात सध्या कोणताच व्यक्तीसमूह तटस्थ आणी अबाधित राहू शकत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्या तरुण पिढीची (जेव्हा भारतात सर्वात अधिक तरुण वर्ग आहे) मूळे पक्की नसतील तर प्रवाहपतित होण्याशिवाय भारताकडे काहीही पर्याय उरत नाही. जागतिकीकरणाच्या प्रवाहाला योग्य दिशा देण्याची क्षमता भारतीय तत्त्वचिंतनात आहे याची फक्त जाणीव असून उपयोग नाही तर त्यासाठी कृती करणे गरजेचे आहे आणी माझ्यामते हिंदू संघटनेचे हेच व्यापक उद्दिष्ट आहे.

saurabh V said...

स्वातंत्र्यवीर सावरकर हि व्यक्ती "द्रष्टी" होती. नुसतं हरीजन म्हणुन काहि फायदा नाहि, त्यांना समातनेने वागवा, तो त्यांचा अधिकार आहे हि त्यांची अत्यंत योग्य बाजु होती.

डॉ.आंबेडकरांनी फक्त सुड म्हणून बुध्द धर्माची कास धरली का? हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. माणुस मोठा हो! पण बुध्द धर्मात जाऊन काय फरक पडला? किंवा आज काय वेगळे चित्र दिसतेय? "स्टॅन्डर्ड ऑफ लिव्हिंग" म्हणतात त्यात किती फरक पडलाय?

Anonymous said...

Chinya,
First off, sorry for not writing this in Marathi.
I agree with your basic premise that caste and casteism
have done great damage to us as a nation and it has to go.
However,

1 Your reasons for doing away with caste stem from you being a staunch hindutva supporter. As such you see caste removal as a tactic. So you want to embrace the lower caste people only because you want some foot soldiers in your Hindutva agenda?
Once hindu rashtra is successfully built, you want to go back to ChaturvarNya?
This is exactly the reason why lower caste people do not believe hindutva concept. They are suspicious of the fair weather friends.

2 Your criticism of RSS is right on target. RSS has never been sincere in its opposition of caste
system. Guruji has openly justified chaturvarNya in the Bible of RSS. Your point that RSS does not spend as much energy on caste eradication as on Mandir Masjid fight is correct. After all it is very easy to inflame the passions of jobless higher caste youth and instigate them to tear down mosques than do the constructive work of caste eradication. Another reason is that the vast majority of RSS cadre belong to brahmin/upper caste, so they do not feel the pinch of casteism.

3 Savarkar was a great social reformer, no doubt. However did you ever wonder

A Why Savarkar is known only in Maharashtra?
B Why even in Maharashtra Savarkar followers are limited to Brahmin community?
C Why Savarkars party Hindusabha could never really grow beyond a few hundred people?
D Why Savarkar vanished from the sociopolitical scene from 1948 till his death in 1963?
E Why RSS maintained a distance from him till 1980s?
F Why Pandharpur temple did not allow untouchables till 1948.


4 Your last paregraph ( in the bold font ) is a needless attack on seculars. What makes you think secular people do not want hindus to unite? Even in that para your reason for abolition of caste is because that will bring good days to hindutva.
In other words you need headcount in your war againts muslims and so reluctantly you are showing mercy to the lower caste people by accepting them till you need them. You want cannon fodder.


I believe in abolition of caste system because it goes againt the very dignity of human being.

As for Ambedkar, neo buddhas are in a far better social position today than their dalit ounterparts in hinduism.

Dr.Chinmay Kulkarni said...

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
my friend u have not written who u r.so i'm putting answer 2 ur questions here.hope u read dem n inform me if u do.

ur allegation dat 'Hindutva followers want lower caste people only till Hindu Rashtra will be built' is baseless.der is no such thing.dis allegation has no evidences.in 21st century,it is impossible 2 go 2 Chaturvanya system.

if u say dat as Golwalkar guruji had supported Chaturvarnya,once Hindu Rashtra will be bulit der will be bringing back of casteism as was practised earlier in India den i would like 2 tell u my frined dat even Gandhiji was supporter of Chaturvarnya.

what r ur answers 2 d questionair u have written???Savarkar was very famous at his times allover India.why Mahasabha vanished after Savarkar-bcoz Savarkars rationalism and Vidnyanwaad was certainly not digestable 2 dos days.

what makes me think dat seculars r against removing casteism??d situations around us makes me think so.look at politics in maharashtra.NCP-Congress have tactfully learned 2 divide people on caste basis while parties like Shivsena-MNS do not practise casteism in der parties.u can look at all d seculars from Lalu to Mulayam to congress,everywhere casteism is rampant.de just make a show dat de r against casteism but in reality de r casteists.

when i wrote dat without abolishing castes hindutva will not get good days,i meant it for d Hindutva followers 2 understand d significance of dat cause.i have no love for casteism n my caste.n i have written dat in my article 2.i have written dat we must abolish caste for Hindutva,for d nation n most important for d humanity.

about Ambedkar,neo buddhists gave importance 2 education n de started coming 2 cities which has brought dem better condition.

Unknown said...

सुन्दर विश्लेषण केलेस मित्रा... सद्यस्थितीतील जातीयवाद अनी नव-जातिवाद हे पण पटन्यासारखा आहे.. अणि हिन्दुत्ववाद्यान्नाच हे शिवधनुष्य पेलाव लागणार हे ही खरच!!
अभिनन्दन!!

Unknown said...

सुन्दर विश्लेषण केलेस मित्रा... सद्यस्थितीतील जातीयवाद अनी नव-जातिवाद हे पण पटन्यासारखा आहे.. अणि हिन्दुत्ववाद्यान्नाच हे शिवधनुष्य पेलाव लागणार हे ही खरच!!
अभिनन्दन!!

vishal dixit

Anonymous said...

हे सर्व वाद गाडा आणि सर्वांची एकजूट करा.

त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याची, विचारवंताची, समाजसुधारकाची आवश्यकता आहे.

असा नेता कुठे मिळेल? हल्लीच्या काळात असा त्याग करायला कोण तयार आहे आणि केलाच असा त्याग तर त्याची किंमत कोण ठेवणार आहे?

आता सावरकरांसारखा(त्यागी) नाही तर श्रीकृष्णासारखा राजकारणी हवा.

लेख मात्र चांगला झाला आहे


Mrunmayee

Unknown said...

ultimate...

Anonymous said...

Good avadala , shubhechha lekhabaddal